नाशिक : सरकारचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनी सोबत यायला हवं. सरकारचं धोरण बदलायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट करावीच लागेल, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.
नाशिक जवळील देवरगाव येथील शासकीय आश्रम शाळेच्या वस्तीगृहाच्या भूमिपूजन प्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सद्यस्थितीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यामुळे शेती माल निर्यातीवर परिणाम झाला आहे. आमच्याकडे शेती मंत्रीपद होत तेव्हा राज्यासह देशभरात अनेक उपक्रम राबविले. शेतीला आणि शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले, मात्र आज चित्र वेगळे असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला.
शरद पवार पुढे म्हणाले की, अनेक वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील या भागात आलो. दोन अडीच वर्षांपूवी विधानसभा निवडणुका प्रचार दरम्यान आलो होतो. सरोज अहिरे यांना तुम्ही निवडून दिलं. त्याचा बदल आज दिसतो आहे. तुम्ही भरभरून मतदान केल्याने अहिरे निवडून आल्या. काम होत आहेत, आगामी निवडणुकांना तुम्ही अशीच मदत कराल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
नाशिक जिल्ह्यात हजारो शेतकरी शेती करतात. ऊसाची शेती ही अनेकजण करतात. ऊस शेती संदर्भात संशोधन होणं गरजेचे आहे. त्यासाठी नाशिक साखर कारखाना चालू होणं महत्वाचं आहे. त्याकडे राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. ऊसाच्या पिकाला चांगला भाव मिळून साखर उत्पादन चांगले होईल, असेही शरद पवार म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांना शाळा हवी, वसतिगृह हवं, पिण्याची पाणी हवे. आदिवासी मुलामुलींना चांगली सुविधा मिळेल.
तुम्ही आम्ही हे सरकार बदलू शकतो...
नाशिम जिल्हा उत्तम शेती करणार जिल्हा आहे. या जिल्ह्यात द्राक्ष डाळिंब, कांदा शेतीचे उत्पादन घेतले जाते. तसेच गिरणारे हे टोमॅटो पिकाचे प्रसिद्ध मार्केट म्हणून ओळखले जाते. मात्र सद्यस्थितीत सरकार धोरण शेतकरी विरोधी असल्याचे दिसते आहे. सरकारने जर मनावर घेतले तर आपला शेतकरी महाराष्ट्र काय देशाची गरज भागवू, असे शरद पवार म्हणाले. कांद्याच्या किमती कोसळल्या आहेत. त्याला कारणीभूत सरकार आहे, हे धोरण बदलायला हवे, तुम्ही आम्ही सोबत असल्यावर हे शक्य आहे, सरकार बदलायले हवे, हे काम तुम्हाला आम्हाला करावेच लागणार आहे, असे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केले.
हे सगळं बदलायचं असेल तर...
शरद पवार यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांच्या हातात सत्ता त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. आज कोणत्याच शेतमालाला भाव नाही. आमच्याकडे शेती मंत्रीपद होत तेव्हा अनेक उपक्रम राबविले. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, पाणी मिळालं पाहीजे , बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. हे सगळं जेव्हा होईल तेव्हा काळ्या आईशी इमान राखणारा शेतकरी परदेशातील अन्नधान्यावर जगणार नाही. तेच काम आम्ही केलं,त्यावेळी तांदूळ निर्यात करणारा पहिला देश झाला. द्राक्ष, गहू यांसह अनेक पिके निर्यात होऊ लागली. आणि हे होऊ शकतं. हे जर करायचा असलं तर शेतकऱ्याला घामाची किंमत केली पाहिजे, बी बियाणे दिले पाहिजे हे सगळं सरकारने केले पाहिजे.