Nashik News : जागतिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) जागतिक विक्रम साकारला जाणार आहे. शेफ विष्णू मनोहर हे तब्बल 4 हजार किलो भगर (Bhagar) बनविणार असून नाशिककरांना खाऊ घालणार आहेत. त्यामुळे नाशिककरांना विशेष अनुभूती मिळणार आहे. 


नाशिकमध्ये 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र मिलेट्स मिशन, नाशिक भगर मिल असोसिएशन यांच्या सहकार्याने तृणधान्य वर्ष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजित कार्यक्रमात शेफ विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) 4 हजार किलो भगर बनवून नाशिककरांना खाऊ घालणार आहेत. आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्समधील मिलेट्स प्रकारातील हे एकमेव रेकॉर्ड होणार असून, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससह विविध ठिकाणी याची नोंद घेतली जाणार असल्याची माहिती सेफ विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सेलिब्रिटी मास्टर शेफ विष्णू मनोहर हे नाव तसं सर्वांच्याच परिचयाचं आहे. एकाहून एक सरस लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी तयार करणारे विष्णू मनोहर आता तब्बल सोळावा विक्रम घडवण्याच्या मार्गावर आहेत. 12 फेब्रुवारी रोजी विष्णू मनोहर 4 हजार किलोंची ‘भगर' तयार करणार आहेत. 15 रेकॉर्डनंतर आणखी एक नवा विक्रम विष्णू यांच्या नावे नोंदवला जाणार आहे.


युनेस्को ने 2023 हे वर्ष मिलेट्स (तृणधान्य) वर्ष  म्हणून नुकतेच जाहीर केले आहे. भारत तृणधान्य उत्पादनात आघाडीवर आहे. युनेस्कोच्या या उपक्रमात तृणधान्य प्रचार आणि प्रसारच्या बाबतीतही भारताला सर्वोच्च स्थान आहे. तृणधान्यमधील  जीवनसत्व, शुद्धता आणि धान उत्पादकांचा फायदा नजरेसमोर ठेवून भारत अनेक उपक्रमातून याचा प्रचार प्रसार करणार आहे. नाशिकची भगर भारतात प्रसिद्ध आहे. तिचा अधिक प्रसार व्हावा म्हणून नाशिक भगर मिल असोसिएशनने  पुढाकार घेऊन महाराष्ट्र मिलेट्स मिशन यांच्या सहकार्याने  प्रख्यात सेफ विष्णू मनोहर यांच्या या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .


जागतिक रेकॉर्ड 


एकाच वेळी 4 हजार किलो पेक्षा जास्त भगर एकाच कढईत शिजवून लोकांना मोफत वाटण्यात येणार आहे.  हे तृणधान्य प्रकारातील जागतिक रेकॉर्ड होणार आहे. सेफ विष्णू मनोहर यांनी आतापर्यंत विविध  पंधरा रेकॉर्ड केले असून, नाशिक मधील हे त्यांचे 16 वे जागतिक रेकॉर्ड असणार आहे. याची नोंद अनेक रेकॉर्ड्स बुक्स मध्ये केली जाणार आहे. 


नागपूरहून विशेष कढई 


4 हजार किलो भगर एकाचवेळी शिजवण्यासाठी नागपूर येथे खास कढई तयार करण्यात आली आहे. त्या कढईचे  वजन सुमारे दीड हजार किलो असून, 10 बाय 10 फूट व्यास आणि 5 फूट उंच आहे. त्यासाठी 3 प्रकारचे 22 किलो वजनाचे मोठे चमचे ही तयार करण्यात आले आहेत. 


मोफत भगर वाटप 


12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा भगर शिजवण्याच्या या उपक्रमास सुरवात होईल. 11 पर्यंत भगर शिजवून तयार होईल. यांनतर ती नागरिकांना मोफत वाटण्यात  येणार आहे. काही भगर नाशिकमधील अनाथालये, वृद्धाश्रम आदी ठिकाणी देण्यात येणार आहे.  


भगरची खास रेसिपी ....


भगर बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी खास रेसिपी तयार केली असून, त्यासाठी भगर 400 किलो ,बटाटा 250 किलो, मीठ 37 किलो,  तेल, 125 किलो, पाणी 2700 लिटर, जिरा 12 किलो, शेंगदाणे 100 किलो,  शेंगदाणे कूट 125 किलो,  दही 400 किलो, 50 किलो, तूप 100 किलो, दूध 100 लिटर हे साहित्य वापरून 4 हजार किलो भगर तयार होणार आहे.