Nashik Crime : शेतीच्या जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात टिकाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नाशिक (Nashik) शहराजवळील मुंगसरा येथे हि घटना घडली आहे. यामुळे परिसरात
जमिनीच्या वादातून हा खून (Murder) झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सकाळी शेतावर जात असताना दोन्ही गटात शेताच्या बांधावर शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले.यावेळी पुतण्याने काकाचे हात धरून ठेवले आणि सख्या भावाने आपल्या भावाच्या डोक्यात टिकाव घातला. यावेळी गंभीर रित्या जखमी झालेले बळवंत कोंडाजी शेळके (रा.यशवंतनगर, मुंगसरा) त्यांचा मृत्यू झाला. मौजे जलालपूर शिवारात असलेल्या शेतावर ही घटना घडली. नाशिक तालुका पोलिसांनी या प्रकरणी संशयित जयदीप शेळके यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बळवंत शेळके व त्यांचा सख्खा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके यांच्यात सन 2015 पासून जलालपुर येथील जमिनीवरून दोन्ही भावांमध्ये वाद होते. यावरून सातत्याने त्यांच्यात भांडणे व्हायची. गुरुवारी सकाळी श्रीहरी यांचा मुलगा जयदीप व पत्नी संशयित सुमन देखील मळ्यात होत्या. त्यावेळी बळवंत व त्यांचा दुसरा भाऊ यशवंत शेळके आणि मुलगा अक्षय शेळके हे मळ्यात जात असताना त्यांनी त्यांचा रस्ता अडवला. पुन्हा त्यांच्यात शेतीवरून भांडण सुरू झाल्याने यशवंत व अक्षय या काका-पुतण्यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित जयदीप यांनी बळवंत यांना धरून ठेवले व श्रीहरी यांनी बाजूला पडलेला टिकाव उचलून बळवंत यांच्या डोक्यात मारला असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान बळवंत यांना त्यांचा मुलगा अक्षय भाऊ यशवंत यांनी पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव या पथकासह घटनास्थळी रवाना झाल्या. त्यांनी संशयित जयदीप याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. मात्र त्याचे वडील संशयित श्रीहरी व सुमन यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला जात होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मयत शेळके पाटबंधारे विभागात कार्यरत
मयत बळवंत शेळके हे मागील अनेक वर्षांपासून पाटबंधारे खात्यात नोकरीला होते. नाशिक शहरातील त्र्यंबकरोड वरील सिंचन विभागात ते शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे चौकीदाराची जबाबदारी सध्या देण्यात आलेली होती. गुरुवारी त्यांची रात्रपाळी असल्याने सकाळी आपला मुलगा अक्षय व लहान भाऊ यशवंत यांच्या सोबत शेतावर गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.