Nashik Leopard : नाशिक शहर (Nashik City) आणि बिबट्या (Leopard) हे जणू समीकरण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील गर्दीचा परिसर असलेल्या सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याने पहाटे पहाटे दर्शन दिले होते. त्यानंतर आता सातपूरच्या निवेक परिसरात बिबट्याचे आगमन झाल्याने वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
एकीकडे निसर्गाच्या सानिध्यात राहणारा बिबट्या आता शहरात धाव घेऊन लागला आहे. शहरातील वर्दळीच्या तसेच्या वसाहतीच्या ठिकाणी नागरिकांच्या दृष्टीस बिबट्या पडत असल्याने भीतीचे वातावरण आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील मळे परिसर असलेल्या भागात बिबट्याचे (leopard) दर्शन होत होते मात्र आता बिबट्याचा वावर शहरातील सिमेंटच्या जंगलात वाढल्याने वनविभागाने चिंता व्यक्त केली आहे.
नाशिक शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या सातपूर एमआयडीसी परिसरातील यश एंटरप्राइजेसजवळ बिबटयाचे दर्शन झाले आहे. रात्रीच्या सुमारास हा बिबट्या येथील वसाहतीतून फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यानंतर कंपाऊडवरून उडी मारून बिबट्या पसार झाल्याचे सीसीईटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दरम्यान घटनास्थळी वनविभागाच्या टीमसह पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी शहरातील सिटीसेंटर मॉल लगतच्या ठक्कर डोम परिसरात बिबट्याला रस्त्यावर वावरताना येथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने पाहीले होते. या परिसरात सकाळी कामावर जाणारे तसेच मॉर्निंग वोॅकला जाणार्यांचे प्रमाण जास्त आहे. त्या सर्वांची चिंता वाढल्याचे चित्र आहे. तसेच बिबट्या एका रात्रीत 25 ते 30 किलो मिटरच्या परिसराला फेरा मारत असून तो एकाच जागेवर स्थिर राहत नसल्याने शहरात तो रमेल अशी शक्यता कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे. तर वनखात्याने (Forest Department) या परिसरात शोध मोहीम राबविली असता त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने नदीच्या मार्गाने बिबट्या सटकला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये
एकीकडे बिबट्या आला रे आला कि नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे बिबट्याही चवताळतो. अशा घटनाही यापूर्वी नाशकात घडल्याच्या पाहिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता, घरातच थांबावे, पॅनिक होऊ नये, तसेच कुठल्याही अफवा समाजमाध्यमांत पसरवू नये, वनविभागाला तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नाशिक वनविभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.