Malegaon Wedding : लग्न म्हटलं नवरा नवरीची हौस मौज असते. घरातल्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण असते. त्यामुळे कुटुंबप्रमुख आपल्या मुलीची, आपल्या मुलाचे लग्न थाटामाटात व्हावे, यासाठी जीवाचे रान करत असते. हल्ली विवाह सोहळ्यात अनेक फॅडही आल्याचे अनेकदा दिसून येते. हौसेला मोल नसते, याची प्रचिती नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव शहरात अनुभवयास मिळाली आहे. 


आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्न.. लग्नाचा हा सोहळा अविस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येकजण काहीतरी खास प्रयत्न करतो.. असाच एक वेगळा प्रयत्न नाशिकच्या मालेगावमधील (Malegaon) बारा बलुतेदार मित्र मंडळाचे बंडूकाका बच्छाव यांनी घडवून आणला आहे. मालेगावमध्ये आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या विवाहस्थळी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ 'एन्ट्री' ही थेट हेलिकॉप्टरमधून (Helicopter Entry) करण्यात आली. हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं आणि याच वाक्याची प्रचिती देणारा सोहळा मालेगावमध्ये बघायला मिळाला.


मालेगाव तालुक्यातील लखमापूर (Lakhmapur) येथील नवरा मुलगा लोकेश आणि चंदनपुरी येथील वधू पूर्वी या आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या लग्न सोहळ्यासाठी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ 'एन्ट्री' ही थेट हेलिकॉप्टर मधून करण्यात आली. मालेगाव येथील आदिवासी कुटुंबातील वर आणि वधू हेलिकॉप्टरने दाखल झाल्याची ही घटना पहिल्यांदाच घडत असल्याने वधू -वरांना पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. मालेगाव शहरातल्या मसगा महाविद्यालयाच्या मैदानावरुन सजवलेल्या रथात निघालेल्या या आगळ्या वेगळ्या वर-वधूंची मिरवणूक पाहण्यासाठी बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


जुळून आल्या रेशीमगाठी.. 


दरम्यान, येथील बारा बलुतेदार मित्र मंडळाचे बंडू काका बच्छाव आणि वधू पिता कैलास पवार या दोघांची 30 वर्षांपूर्वीची अपार अशी मैत्री आहे. वधूपिता यांनी बंडूकाका बच्छाव यांच्याकडे तुमच्या मुलीचा जसा शाही विवाह सोहळा झाला होता, सोहळ्याची संपूर्ण नाशिक जिल्हा व पंचक्रोशीत चर्चा झाली होती, तसाच आगळा वेगळा विवाह सोहळा माझ्या मुलीचा देखील व्हावा, अशी इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार मित्र बंडू काका बच्छाव यांनी मित्राला दिलेला शब्द पूर्ण करत लाखो रुपयांचा खर्च करत विवाह सोहळा पार पाडत मित्राची इच्छा पूर्ण केली.. थेट वधू पूर्वी व वर लोकेश यांना हेलिकॉप्टर द्वारे लग्न मंडपात आणले. लग्नसोहळ्याप्रसंगी शेवटी वधूपित्याने भावनिक होत, मित्र असावा तर असा अशा शब्दात बंडूकाका बच्छाव यांचे आभार मानले. सोबतच बाराबलुतेदार मित्र मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी विवाह सोहळ्यास केलेल्या सहकार्याबद्दल व सर्वोतपरी मदत केल्याची भावना ठेऊन आभार मानले.