Shravani Somwar : श्रावणातील (Shravan) आज पहिला सोमवार असून यामुळे त्र्यंबक राजाच्या (Trimbakeshwer) दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) बंद असलेली श्रावणी सोमवारची ब्रम्हगिरी फेरी (Bramhgiri Feri) देखील यावर्षी होत असल्याने प्रदक्षिणेसाठी भाविकांची त्र्यंबकमध्ये गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भाविकांना ब्रम्हगीरी फेरी नेमकी कोणत्या मार्गाने केली जाते. हे पाहुयात!
श्रावण म्हटला ब्रम्हगिरी प्रदक्षिणा केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हि परंपरा सुरु आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे फेरीवर बंधने आली होती. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीसाठी हजेरी लावली आहे. अनेक भाविक रविवारी रात्री कुशावर्तापासून फेरीची सुरुवात करतात. हि फेरी साधारण 40 किलोमीटर असल्याचे भाविक सांगतात. ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते.
श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजे रविवारी किंवा सोमवारी पहाटे या प्रदक्षिणेला सुरवात केली जाते. ब्रह्मगिरी फेरीची सुरवात त्र्यंबकेश्वर शहरातील प्रसिद्ध असलेल्या कुशावर्त तीर्थापासून (Kushawart Tirtha) होते. या ठिकाणी स्नान करून प्रदक्षिणेला सुरवात करतात. तिथून सरळ बाहेर पडल्यानंतर नाशिकच्या दिशेचा रस्ता वाटचाल करावी. काही अंतर पार केल्यावर उजव्या हाताला प्रयागतीर्थ नामक कुंड लागते. या प्रयागतीर्थ कुंडाला फेरी मारून भाविक पहिनेच्या दिशेने चालू लागतात. यावेळी आपल्या आजूबाजूची गर्द वनराई, फेसाळणारे धबधबे पुन्हा भाविकांना हुरूप देतात.
निसर्गाचा सानिध्यातून पुढे जात एक तासाभरात उजवीकडे जाणारा रस्ता लागतो. एक रास्ता घोटीकडे तर दुसरा रस्ता खोडाळाकडे जात असतो. बाजूलाच भिलमाळ हे गाव लागते. भिलमाळ हे गाव सोडल्यानंतर काही अंतरावर धाडोशी हे गाव लागते. येथून पुढे गेल्यानंतरमुख्य रास्ता सोडून उजव्या बाजूला सिमेंटचा रास्ता पुढे जावे लागते. पूर्वी हा रास्ता शेतातून जात होता. त्यावेळी भाविकांना चालणेही मुश्कील व्हायचे . मात्र आता स्थानिक प्र शासनाकडून सिमेंटचा रस्ता म्हणजेच फेरी मार्ग बनविण्यात आला आहे. हाच सिमेंटचा घाट सदृश्य चढण पार केल्यानंतर गौतमाच्या डोंगराच्या पायथ्याशी हा रस्ता थांबा घेतो.
दरम्यान या घाट माथ्यावर गौतम ऋषींचे छोटेसे मंदिर असून जागा कमी असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मंदिराचे दर्शन घेतले, कि अर्धी फेरी संपल्याचे लक्षात येते. मात्र यानंतरचा मार्ग अगदी खडतर होत जातो. निसरडे रस्ते, चिखल माती, त्यामुळे डोंगर उतरताना सांभाळून उतरावे लागते. तासाभराचे अंतर पार केले कि, पुढचा आपला रस्ता हा आदिवासी पाड्यांमधून जातो. शेतीची कामे सुरु असल्याचे दिसते. परतीच्या रस्त्यावर डांबरी सडक लागल्यानंतर छोटी छोटी मंदिरेही रस्त्यात लागतात.
शेवटच्या टप्प्यात भाविक सापगाव गावाजवळ येतात. यानंतर मुख्य रस्त्याला लागल्यानंतर काही अंतर पार करून गेले कि आपण पुन्हा त्र्यंबकेश्वर दाखल होतो आणि प्रदक्षिणा पूर्ण होते. एकूणच श्रावणात मोठया प्रमाणावर भाविक या ब्रम्हगिरी फेरीसाठी येत असतात. रोजच्या धावपळीतून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात जाता येते. त्यामुळे असं म्हटले जात कि, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा एक आनंददायी प्रवास आहे. विशेष म्हणजे श्रावणात पाऊस असताना प्रदक्षिणा करणे हा अनुभव खरोखरच अगदी वेगळा आहे. आणि तो आनंदी अनुभव पुन्हा पुन्हा घ्यवासा वाटतो.