Shravan Somvar In Nashik : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर श्रावणी सोमवारचे वेध लागतात. मागील दोन वर्षे बंद असलेल्या ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसह त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. त्र्यंबकेश्वर प्रशासनांसह जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

 

श्रावण महिन्यात सोमवारला विशेष महत्व

श्रावण महिन्यात सोमवार या दिवसाला एक वेगळेच महत्व असते. या दिवसात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथे प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आज पहिला सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. याचाच विचार करून पहाटे चार वाजताच मंदिर उघडण्यात आले आहे. मात्र भाविकांना कडक बंदोबस्तामुळे दूरवरून पायी यावे लागत आहे.  

 

जिल्हा प्रशासनाकडून नियोजन

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून भाविक येत असतात. त्याच प्रकारे या ठिकाणी श्रावण महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. हीच गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नियोजन केलेले  प्रांताधिकारी यांनी नियमावली बनवली आहे. यासाठी। भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी सहा ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत. जेणेकरून शहरात गर्दी होणार नाही. आज पहिला सोमवार असून 20 हजाराहून अधिक भाविक येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. 

 

'15 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता

दर्शनात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. यावर्षी 1 ऑगस्टला पहिला, 8 ऑगस्टला दुसरा, तर 15 ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे. '15 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरूनच प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. या फेरीसाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत असतात. त्यांच्यासाठी विशेष बस सोडल्या जाणार आहेत, तसेच परिक्रमेसाठी राज्य परिवहन महामंडळ, महावितरण, पोलिस विभाग त्र्यंबकेश्वर नगरपालिका, वैद्यकीय पथक यांची सज्जता असून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे नियोजन करण्यात आले आहे. 

 

ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला गर्दी 

करोना निर्बंधांमुळे सलग दोन वर्षे त्र्यंबकेश्वर येथील श्रावणी सोमवारी होणारी परिक्रमा बंद होती. आता दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा त्र्यंबकेश्वरच्या फेरीचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. आज पहिला श्रावण सोमवार असल्याने ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला अनेक भाविक दाखल होत आहेत. शिवाय काही भाविकांनी काल मध्यरात्री पासून प्रदक्षिणेला सुरवात केल्याचे पाहायला मिळाले. 

 

इथे करा वाहने पार्किंग

श्रावणी सोमवारसाठी येणाऱ्या भाविकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कैलास राजा नगर, महावितरण सब स्टेशन शासकीय विश्राम गृह लगत, पेगलवाडी फाटा, प्रयागतीर्थ लगत रेणुका हॉल, श्री चंद्र लॉन्स, या ठिकाणी खाजगी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

सिटीलिंकच्या जादा बसेस

श्रावण सोमवारची गर्दी लक्षात घेऊन आज सकाळपासून सिटीलिंकच्या १० जादा बसेस सोडण्यात येत आहेत.

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सिटीलिंकच्या वतीने पहिल्या, दुसर्‍या व चौथ्या सोमवारी दररोजच्या २२ बसेस व्यतिरिक्त १० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी त्र्यंबकेश्वरसाठी असलेल्या नियमित बसेस बरोबरच या अतिरिक्त १० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.