Nashik NCP : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या (NCP) स्थानिक नेत्यांवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून कारवाई केली जात आहे. नाशिक शहरात देखील अशीच परिस्थिती असून एका बाजूला छगन भुजबळांच्या समर्थनार्थ बँनरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर कार्यकर्ते अद्यापही संभ्रमात असून नेमकी कुणाची बाजू घ्यायची किंवा कार्येकर्ते नेमके कुणाच्या बाजूने आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 


राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानं चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर (Shivsena) आता राष्ट्रवादीत धुसफूस सुरु झाली असून सरकारमध्ये सहभागी झालेल्या बड्या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्याकडून नव्या पदांची नियुक्ती करण्यात येत आहे. अशातच दोन्ही नेत्यांच्या जोरदार बैठका सुरू असून राष्ट्रवादी मूळ पक्षाकडून अजित पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे वातावरण चिघळले असून नाशिकमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील अजित पवार यांच्यासोबत असल्याने नाशिकमधील (Nashik) नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. 


अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. अनेक नेते अजित पवार, छगन भुजबळांच्या समर्थनात बॅनरबाजी करत आहेत. तर अनेक नेत्यांचे अद्यापही स्पष्ट झालेले दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नाशिकमधील राष्ट्रवादीमध्ये अनेक घडामोडी होत आहेत. नाशिकमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांवर कारवाईला मूळ राष्ट्रवादी पक्षाकडून सुरुवात झाली आहे. काल युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर कारवाई झाल्याने आजही काहींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झालेत.


नेत्यांवर कारवाई, कार्यकर्ते संभ्रमात 


दरम्यान छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जे नेते अजित पवार छगन भुजबळांसोबत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र अद्यापही नाशिक शहरातील राष्ट्रवादी पक्षाकडून ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. आज दुपरी बैठक बोलवण्यात आली असून यानंतर नाशिक राष्ट्रवादी नेमकी कुणाच्या बाजूने हे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वीच अनेक नेत्यांकडून बॅनरबाजी, समर्थनार्थ पोस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे छगन भुजबळ की शरद पवार असा संभ्रम अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे.