Nashik APMC Election : नाशिकसह बारा बाजार समित्यांची निवडणुकांची (Bajar Samiti Election) रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) पक्षांनी भाजप शिवसेना पक्षाशी हातमिळवणी केल्याचे चित्र आहे. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना ठाकरे गटाचे दराडे बंधूनी खुले आव्हान दिल्याने येवल्यात राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट पाहायला मिळणार आहे. तर दिंडोरीत (Dindori) महाविकास आघाडी विरुद्ध सर्वपापक्षीय पॅनल उभे ठाकले आहे. 


ग्रामीण राजकारणातील महत्वाची निवडणूक म्हणून बाजार समिती (Nashik APMC Election) निवडणुकीकडे पाहिले जाते. मात्र राज्यात पक्षीय समीकरण महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट असे असताना मात्र स्थानिक पातळीवर हे चित्र पूर्णतः बदलल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये (Jalgaon) देखील महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवगेळे वाट चोखाळत भाजप शिंदे गटाला (शिवसेना) सोबत दिली आहे. एकीकडे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट एकत्र येत महाविकास आघाडी असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र वेगळ्या राजकीय समीकरणांची नांदी आहे. राज्यात भाजप शिवसेनेचे विरोधक म्हणून महाविकास आघाडी काम पाहत असताना बाजार समिती निवडणुकीत मात्र शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. 


आज नाशिकसह जिल्ह्यातील बारा बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. मात्र या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दादा भुसे (Dada Bhuse), छगन भुजबळ, सुहास कांदे, माणिकराव कोकाटे आदींच्या समोर इतर गट उभे ठाकले आहेत. येवला बाजार समितीचा विचार केला तर राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते तथा माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यंदा बाजार समितीच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातले. येवला असो की लासलगाव बाजार निवडणुकीत भुजबळ थेट रिंगणात उतरले होते. मात्र येवल्यात महाविकास आघाडीला छेद देत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांनी थेट भुजबळांना खुले आव्हान दिल्यामुळे येथील रंगत वाढली आहे. तर लासलगाव बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचेच पंढरीनाथ थोरे यांनी भाजपचे ज्ञानेश्वर जगताप यांच्या साथीने भुजबळांची कोंडी केली आहे. 


तर जिल्ह्यातील दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी वेगळचं चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 18 जागांसाठी मतदान होत असून दोन पॅनल उभे असून शेतकरी उत्कर्ष पॅनल व परिवर्तन पॅनल मध्ये सरळ सरळ लढत होत आहे. यात एका पॅनलमध्ये महाविकास आघाडी तर दुसरा पॅनल सर्वपक्षीय नेत्यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मात देण्यासाठी इथं भाजपसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी एकसाथ दिली आहे. दोन्ही पॅनलमध्ये सर्वपक्षीय उमेदवार असल्याने सहकार क्षेत्रात पक्षापेक्षा विचारधारेला महत्त्व दिले जात आहे. आता दोन्हीही पॅनलच्या वतीने जोरदार प्रचार यंत्रणा राबविली असली तरी मतदार शेवटी कोणाच्या बाजूने कौल देतो, याकडे लक्ष लागून आहे. 


स्थानिक समीकरणे बदलली... 


एकूणच राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे तर महाविकास आघाडी विरोधक म्हणून काम पाहत आहेत. दुसरीकडे बाजार समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्येच एकमत नसल्याचे चित्र यावरुन दिसून येत आहे. एकीकडे येवला मतदारसंघ हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला या ठिकाणी स्वतः छगन भुजबळ मैदानात उतरुन प्रचार दौरे केले, मात्र ठाकरे गटाचे नेते विरुद्ध पॅनलमध्ये असल्याने भुजबळांची कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे आणि स्थानिक पक्षीय समीकरणे बदलल्याने महाविकास आघाडीला विचार करावा लागणार असल्याचे दिसते.