Nashik News : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS University) नाशिक (Nashik) येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय (Medical Collage) व त्यास संलग्नित 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीच्या बांधकामाला राज्यशासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संस्थेचे 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीसाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा करण्यात येत होता अखेर या कामांच्या  अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संस्थेचे 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430  खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारत बांधकामासाठी मा. उच्चस्तरीय सचिव समितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने रुपये 348 कोटी 41 इतक्या रक्कमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.


दरम्यान शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून नाशिक येथील विविध 7 विषयांमध्ये महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरु करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यक परिषदेने मान्यता दिलेली असून जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे दि. 09 एप्रिल 2022 रोजी पदव्युत्तर वैद्यकीय विभाग स्थापन करण्यात आला आहे. या पदव्युत्तर संस्थेसाठी अधिष्ठाता यांची दि. 21 फेब्रुवारी 2022 रोजी नेमणूक करण्यात आली असून इतर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांच्या सुद्धा माहे. फेब्रुवारी 2022 मध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जवळपास 15 विषयांमध्ये वर्ष निहाय 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा मिळणार आहे.  शैक्षणिक वर्ष सन 2023-24 पासून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या इमारतीमध्ये सद्यस्थितीत सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.


भुजबळांचे पत्र 
दरम्यान या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी आणि बांधकामासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्याकरिता मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्तावाला दि. 05  ऑगस्ट 2022  रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तर समितीने मान्यता देवूनही सुद्धा या कामाच्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित झालेला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430  रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकास लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता द्यावी यासाठी भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांना पत्र दिले होते.