Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल चार कोटींचा विमा (Bima) लाटल्याचे समोर आले आहे. यासाठी संशयितांनी खून (Murder) करत अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर एका महिलेस पत्नी असल्याचे बोगस वारस दाखवत तब्बल चार कोटींचा विमा स्वतःच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. 


नाशिकच्या मुंबई नाका पोलीस (Mumbai Naka Police) हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका महिलेसह पाच संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षी 2 सप्टेंबर 2021 ला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ अशोक भालेराव मृत अवस्थेत आढळले होते. मात्र या घटनेत खून करून अपघात झाल्याचा बनाव रचत पाच संशयित आणि मयत व्यक्तीच्या विम्याचे तब्बल चार कोटी रुपये दुसऱ्याच महिलेला त्याची पत्नी म्हणून बोगस वारस दाखवत विमा क्लेम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात एका महिलेसह पाच संशयतांना रात्री उशिरा मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 2 सप्टेंबर 2021 रोजी रात्री इंदिरानगर जॉगिंगच्या परिसरात रस्त्याच्या कडेला झाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. दुचाकी बाजूला पडलेली असल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती अशोक रमेश भालेराव असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी अनोळखी वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करता सुरू केला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मयताच्या भावाने या अपघाताबाबत संशय व्यक्त करत तपास करण्याचे पोलिसांना पत्र दिले होते.


त्यानुसार पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे फिरवत संबंधित घटनेची कागदपत्रे न्यायालयातून मागविण्यात आली. घडलेल्या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. मयत अशोक भालेराव यांच्या विम्याचे चार कोटी रुपये रजनी उके या महिलेच्या नावावर जमा झाल्याचे तपासात समोर आले. संशयित महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने मंगेश सावकार याचा सहभाग असल्याचे सांगता इतर संशयितांची नावे सांगितली. पथकाने संशयित सावकार यास ताब्यात घेत चौकशी केली असता खून करून अपघात दाखवत विम्याची रक्कम एकमेकांत वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी संशयित मंगेश बाबुराव सावकार, रजनी प्रणव उके,  प्रणव साळवी यांच्या आणखी दोघांना ताब्यात घेत सावकारच्या दुचाकीच्या डीपीतून पिस्टलसह सहा काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. 


दरम्यान या प्रकरणातील पाच संशयितांचा प्लॅन यशस्वी झाल्यानंतर विम्याचे पैसे ठरल्याप्रमाणे बोगस महिलेच्या नवे बँकेत जमा झाले. त्यानंतर महिलेच्या पुढाकारानेच पैशांचे वाटप करण्यात आले. मात्र एका संशयितास रक्कम कमी मिळाल्याने या टोळीत वाद झाले होते, आणि इथंच प्रकरणाचे बिंग फुटले. या संशयिताने मयताच्या भावाला भेटून घडलेली आपबिती सांगितली. त्यानंतरच या खुनाचा सुगावा लागला. दरम्यान संशयितांनी खून करून अपघात बनाव रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयितांकडून खुनाचा कट कसा रचला? विमा कशाप्रकारे वर्ग केला? याच तपास अद्यापही बाकी आहे. याबाबत मुंबई नका पोलिसांकडून तपास केला जात असून यामध्ये आणखी विमा  लाटण्याचे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.