Nashik News : नाशिक शहरात एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शहरातील गंजमाळ (Ganjmal) झोपडपट्टीत राहणाऱ्या साठ वर्षीय आजीबाईचा घुशीने हात कुरतडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकीकडे स्मार्ट सिटी (Smart City) म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात अशी घटना घडल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. 


नाशिक (Nashik) शहरातील भद्रकाली पोलीस स्टेशनच्या (Bhadrakali Police) अंतर्गत येत असलेली गंजमाळ झोपडपट्टी म्हणजेच एकम्दम दाटीवाटीचा परिसर. कोरोना काळात या परिसरात भीषण आगीची घटना घडली होती. दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने महापालिकांकडून (Nashik NMC) सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशातच येथे 90 वर्षीय बबाबाई गायखे या 60 वर्षापासून गंजमाळमधील श्रमिकनगर येथील झोपडपट्टीत राहते. मोठा मुलगा अशोक हा देखील पंचशीलनगरमध्ये राहतो. तर दुसरा लहान मुलगा मनोज हा कामानिमित्त पुण्याला असतो. सध्या बबाबाई हिच्या समवेत तीचा नातू राजू आणि राहुल एखंडे हे राहत होते. 


शुक्रवारी रात्री उशिरा झोपेत असताना आजीबाईच्या हातासह पंजाला घुशीने कुरतडून काढले. यात त्यांचा हात रक्तबंबाळ झाला. रात्री कुठं जायचं म्ह्णून सकाळपर्यत तशाच अवस्थेत झोपून राहिल्या. त्यानंतर सकाळी सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आजीबाईचा जिल्हा रुग्णालय दाखल केले. नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिवसभर उपचार करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या बबाबाई गायखे यांचा रात्री उशिरा मध्यरात्री मृत्यू झाला. मुळात झोपडपट्टीतलं जिण नशिबी आलेल्या महिलेच्या अशाप्रकारचा मृत्यू झाल्याने संवेदनशील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये महापालिकेच्या ठेकेदाराच्या दिरंगाईनेच हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


दरम्यान नाशिक महापालिकेच्या माध्यमातून गंजमाळ परिसरात गेल्या वर्षभरापासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र मूलभूत काम पूर्ण झाल्यानंतर गटारीच्या कॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या भागात उंदीर घुशींचे प्रमाण वाढले आहे. संबंधित ठेकेदारास ते काम करण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र करू करू म्हणत अद्यापही काम जैसे थे आहे. त्यामुळे बबाबाईच्या मृत्युप्रकरणी मनपाचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके म्हणाले. 


महापालिकेने हात झटकले


एकूणच महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे आजीबाईचा आपलं जीव गमवावा लागल्याचे नागरिकांनी सांगितले. एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना वाळीत टाकायच? हा कुठला न्याय? असं जाब येथील नागरिकांनी मनपा प्रशासनास विचारला आह. यावर महापालिकेने या प्रकरणाविषयी हात झटकल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील गंजमाळ भागात महापालिकेच्या वतीने गटारीचे काम सुरु असल्याचे परिसरातील रहिवाशी नागरिकांचे म्हणणे असले तरी या भागातील महापालिकेचे अभियंता गणेश मैद यांनी राजमाल प्रोपडपट्टीत सध्या कोणत्याही प्रकारचे काम सुरु नसल्याचा दावा केला आहे.