Nashik News : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील बारा बाजार समितीमध्ये निवडणूक (Bajar Samiti Election) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर थोड्याच वेळात मतमोजणीला सुरवात होणार आहे. त्यानुसार घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, सिन्नर (Sinner) येथे शुक्रवारी लगेचच मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. उर्वरित बाजार समित्यांची मतमोजणी उद्या पार पडणार आहे, मात्र ज्या बाजार समित्यांची आज मतमोजणी होत आहे, त्या उमेदवारांचे भवितव्य काही तासांत समोर येणार आहे. 


नाशिकसह जिल्ह्यातील बारा बाजार समिती (APMC Election) निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्वच ठिकाणी भरघोष मतदान झाल्याचे मतदारांच्या प्रतिसादावरून दिसून आले आहे. मात्र आजच्या मतदानानंतर अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर अनेक उमेदवारांचा भवितव्य मतपेटीत बंद झाला आहे. तर सुरगाणा बाजार समिती (Surgana Bajar Samiti) निवडणूक अगोदरच बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 13 समित्यांपैकी मनमाडचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत शुक्रवारी मतदान पार पडले आहे. यातील नाशिक, पिंपळगाव, चांदवड, येवला, मालेगाव आणि लासलगाव (Lasalgoan) येथे शनिवारी निकाल लागणार आहे. तर घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, सिन्नर येथे थोड्याच वेळात निकाल हाती येणार आहेत. 


पाच बाजारसमित्यांची मतमोजणी 


जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव या बाजार समित्यांसाठी मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. आज एकूण पाच बाजारसमित्यांची मतमोजणी सुरु होणार आहे. यात सिन्नर, दिंडोरी, कळवण, देवळा व घोटीतून कोणाच्या अंगावर गुलाल पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात जातोय तसेच या बाजार समिती निवडणुका कुणाच्या पॅनलमध्ये येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


असा झालंय सरासरी मतदान?


दरम्यान नाशिक कृषी उत्पन्न समितीच्या निवडणूकीसाठी पेठ तालुक्यातून ग्राम पंचायत व सोसायटी गटासाठीच्या दोन जागासाठी चुरस असून 747 मतदार असून 4 वाजेपर्यंत जोगमोडी केंद्रावर 170 पैकी 164  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती एकूण मतदान 97.50 टक्के इतके मतदान झाल्याचे दिसून येत आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दुपारी 04 वाजेपर्यंत एकूण 2259 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. सरासरी 96.95 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. तर नाशिक बाजार समितीसाठी पाथर्डी केंद्रावर तब्बल 100 टक्के मतदान झाले आहे. सोसायटी गटासाठी 177 तर ग्रामपंचायत गटासाठी 125 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यातील केंद्रांवरदेखील 100 टक्के मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. घोटी बाजार समितीसाठी तब्बल 93 टक्के मतदान झाले आहे.