Yeola Muktibhumi : येवला (Yeola) येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांनी 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली. अन त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर नागपूर (Nagpur) येथील दीक्षाभूमीवर (Dikshabhumi) 14 ऑक्टोबर 1956 ला लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची (Buddha Dhamma) धम्मदीक्षा दिली. त्यामुळेच येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया, तर नागपूरची दीक्षाभूमी हा कळस मानला जातो. आज या घटनेला 87 वर्ष पूर्ण होत असून नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मुक्तीभूमी (MuktiBhumi) म्हणून ओळखले जाणारे ठिकाण बौद्ध बांधवासह आंबेडकरी जनतेच्या आयुष्याला कलाटणी देणारे आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील नाशिक (Nashik) जिल्ह्यातील काळाराम मंदिर सत्याग्रह (Kalaram Mandir) आणि येवला येथे केलेली धर्मांतराची घोषणा महत्वाच्या घटना मानल्या जातात. 13 ऑक्टोबर 1935 ला येवला येथील कोर्टाजवळील मैदानावर सभा भरविण्यात आली. अस्पृश्यांची मुंबई इलाखा सभा म्हणून ही सभा ओळखली गेली. या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या त्यांच्या भाषणात समस्त जनाला हादरवून सोडणारी घोषणा केली. ती म्हणजे 'मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही'. ही धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा म्हणजे भारतीय इतिहासात लिहिलं गेलेलं एक महत्त्वाचे पान. येवला येथील कोर्टाजवळील मैदानावर केली, त्यानंतर या जागेला विशेष महत्व प्राप्त झाले, म्हणूनच या जागेला मुक्तीभूमी म्हणून ओळखले जाते.
येवला येथे मुंबई इलाखा दलितवर्गीय परिषद' भरली होती. या परिषदेचे वक्ते होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सभेतील आपल्या दीड तासाच्या भाषणात त्यांनी 'हिंदू म्हणून मी जन्माला आलो, हिंदू म्हणून मी मरणार नाही' अशी गर्जना केली होती. त्यानंतर अनेक स्तरावरून या घोषणेला विरोध करण्यात आला तर अनेकांनी स्वागतही केले होते. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करून तब्बल तब्बल २१ वर्षांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची धम्मदीक्षा दिली. दरम्यान दरवर्षी येवल्यातील याच 'मुक्तिभूमी'वर धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. पाच दिवस भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात. चर्चासत्र, शाहिरी जलसा, व्याख्याने आदींसह रक्तदान शिबीर आयोजित केले जातात.
मुक्तीभूमी येवला
गेल्या 86 वर्षांपासून येवला मुक्तीभूमीवर धर्मांतर घोषणेचा वर्धापन साजरा करण्यात येतो. जवळपास पाच दिवस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून धम्म जनमानसात पेरला जातो. यासाठी राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी मुक्तीभूमीला भेट देतात. त्याचबरोबर बाबासाहेबांची जयंती असो की महापरिनिर्वाण दिन मुक्तीभूमी आंबेडकरी जनतेच्या पावलांनी गजबजून जात असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला येवल्यातील सभेत केलेली धर्मांतराची घोषणा, त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो समाजबांधवांसह नागपुरात बौद्ध धम्माचा स्वीकार केला. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील दादरची 'चैत्यभूमी' व नागपूरची 'दिक्षाभूमी'सह येवल्यातील या 'मुक्तीभूमी'ला बौद्ध बांधवासह आंबेडकरी जनतेच्या जिवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
'मुक्तीभूमी'ला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा
दरम्यान मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी येवला मुक्तीभूमी स्थळाला महाराष्ट्र शासनाने 'ब' वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जपण्यासाठी अनुयायांना ही विशेष भेट मानली जात आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तब्ब्ल साडेचौदा कोटींचा निधी उपलब्ध करून देताना या मुक्तीभूमीला नवचैतन्य मिळाले. जवळपास 3.30 हेक्टर जागेवर मुक्तीभूमी उभारण्यात आली असून 50 फूट उंचीचा भव्यदिव्य गोलाकार असा विश्वभूषण स्तुप, तळमजल्यावरील विपश्यना हॉल, टॉयलेट ब्लॉक, क्रांती स्तंभ, पाठशाळा, कार्यशाळा, ज्ञानभवन व भिक्कू निवास, लँड स्केपिंग, स्तुपाच्या आतील बाजुस दोन्ही मजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व चळवळीवर प्रकाशझोत टाकणारी अनेक भिंतीशिल्पे, भगवान गौतम बुद्धांचा पंचधातूपासून खास बनविलेला तीन टन वजनाचा आसनस्थ पुतळा, स्तूपाच्या बाहेरील डॉ. आंबेडकर यांचा भव्य असा पूर्णाकृती ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा मुक्तीभूमीचे सौंदर्य खुलवून जातो.