Nashik Accident : अलिकडे लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घेणे महत्वाचे ठरते. अन्यथा अनेकदा नजरचुकीमुळे बालकाला गमावण्याची वेळ पालकांवर येऊ शकते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा नाशिक (Nashik) शहरात एका कुटुंबियांना आला आहे. स्कूल व्हॅनने (School Bus) शाळेत जात असलेली चिमुरडी त्याच स्कूल व्हॅनच्या चाकाखाली आल्याने तिचा करुण अंत झाल्याची घटना नाशिक शहरात घडली आहे. 


शहर म्हटलं पालकांची धावपळ असते. मग मुलांना शाळेत (School) ने आण करण्यासाठी रिक्षा, स्कूल बस, स्कूल व्हॅन आदींचा वापर केला जातो. अशावेळी शाळेत सुरक्षित पोहचण्यासाठी, शाळेतून पुन्हा घरी व्यवस्थित येण्यासाठी पालक देखील खर्चाचा विचार न करता स्कूल बस किंवा व्हॅन अथवा रिक्षाने मुलांना शाळेत पाठवतात. मात्र हीच बस किंवा व्हॅन सुद्धा मुलांसाठी घातक ठरु शकते, याचे ताजे उदाहरण नाशिकमध्ये घडले आहे. स्कूल व्हॅनमधून (Nashik Accident) घरी जाण्यासाठी चिमुरडी उतरली तर खरी, मात्र घरी जात असताना त्याच स्कूल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली येऊन आठ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे. 


चालकाने अचानक गाडी रिव्हर्स घेतली आणि...


पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नाशिक शहरातील जेलरोड भागातील (Nashikroad) पवारवाडी परिसरात घडली आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव असे या आठ वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. ही चिमुरडी शहरातील मराठी शाळेत शिकायला होती. तिला ने आण करण्यासाठी पालकांनी स्कूल व्हॅनची सोय करुन दिल्याने ती रोज या स्कूल व्हॅनने ये जा करत होती. दरम्यान तिला स्कूल व्हॅन घरी सोडण्यासाठी आली होती. स्कूल व्हॅनमधून अपेक्षा खाली उतरुन व्हॅनच्या पाठीमागून घरी निघाली हाेती. त्यावेळी व्हॅन चालकाने अचानक गाडी रिव्हर्स घेतली. त्यामुळे मागच्या चाकाखाली सापडून अपेक्षा गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नाेंद नाशिकरोड पोलिसांनी घेतली असून गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.


मुलांची काळजी घेणं महत्वाचं... 


लहान मुलांकडे थोडे दुर्लक्ष झाल्यास अनुचित घटना होण्याचा धोका असतो. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे खेळत्या वयात मुलांना धोका, सुरक्षा या गोष्टी समजून येत नाहीत. मात्र यासाठी पालकांनी सजग असणे महत्वाचे आहे. अनेकदा पालक कामात व्यस्त असता मुलं चालत चालत किंवा खेळत खेळत घराबाहेर पडत असतात. अशावेळी रस्त्यावर जाण, कुठेतरी पडणं अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे. त्याचबरोबर अलिकडे स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचे फॅड आल्याने याबाबत सुरक्षा बाळगणे महत्वाचे आहे. स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन सुरक्षित आहे का? चालक कसा आहे? या बाबी पालकांनी तपासून घेणे महत्वाचे आहे.