Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांनी उलगडा केला. या घटनेत माजी सैनिकाचा खून (Murder) झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत. सहा महिन्यापूर्वी भावली धरण परिसरात (Bhawali Dam) ही कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. 


घोटी पोलीस स्टेशनच्या (Ghoti Police Station) हद्दीत आंबेवाडी गावच्या शिवारात एक जळालेली कार आढळून आली होती. यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह देखील आढळून आला होता. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए सॅम्पल घेण्यात आलेले होते. तसेच जाब-जबाबावरून सदर प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मयत संदीप पुंजाराम गुंजाळ (Sandeep Gunjal) हे माजी सैनिक होते. ते समृध्दी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी येथे सिक्युरिटीचे काम असल्याची माहिती मिळाली होती. ऑगस्ट 30 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते साउथ पोल समृध्दी महामार्ग येथून त्यांची सॅन्ट्रो कार घेवून गेले होते. सकाळी साडे आठ वाजता जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आंबेवाडी शिवारात मिळुन आला होता. 


नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Police) पथकाने यातील मयत संदीप गुंजाळ हे सिक्युरीटी म्हणून काम करत असलेल्या समृध्दी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी या ठिकाणी भेट दिली. समृध्दी महामार्गाचे कामगार, सिक्युरिटी गार्डस् व ऑफीस स्टाफ यांना चेक करून मयत संदीप गुंजाळ यांच्याबाबत विचारपूस करण्यात आली. संदीप हे त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्याकडील कार घेवून भावली धरण परिसराकडे गेले असल्याचे समजले होते. यानुसार पोलीस पथकाने भावली धरण परिसरात माहीती घेतली असता घटनेच्या दिवशी मयत हा गाडी चालवीत असतांना नांदगाव सदो येथील एका दुचाकीवरील इसमांशी कट मारल्याचे कारणावरून भांडण झाले असल्याचे समोर आले. त्यावरून नांदगाव सदो शिवारातून संशयित आकाश चंद्रकांत भोईर, एक विधीसंर्धीत यांना ताब्यात घेतले. 


काय घडली होती घटना...?


सुमारे 06 महीन्यांपूर्वी समृध्दी महामार्गाचे पूलाखाली सर्कलजवळून नांदगाव सदो गावाकडे स्प्लेंडर गाडीने जात असतांना समोरून एका सॅन्ट्रो कारने कट मारला. म्हणून त्यास संशयितांनी शिवीगाळ केली. त्यामुळे त्याने गाडी थांबवून खाली उतरून शिवीगाळ केल्यांनतर आमच्यात भांडण झाले, त्यातून त्यास चॉपरने पोटावर वार करून जखमी करून जीवे ठार मारले. त्यास गाडीत टाकून भावली धरणाचे दिशेने घाटात जावून निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबविली. त्यावेळेस त्यास ड्रायव्हर सीटवर बसवून गाडीत असलेल्या डिझेल कॅन त्याच्या अंगावर व गाडीवर ओतून देवून त्यास पेटवून दिल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली.