Nashik News : नाशिक (Nashik Division) विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून विभागात लोकसहभागातून 6 हजार, 134 बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून विभागामध्ये एकूण 1227 टी.सी.एम.जलसाठा अडविला असून 12 हजार 268 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात दरवर्षी गावागावांत टँकरने पाणी पुरवठा (Water Supply) केला जातो. अनेक गावात टँकर सुद्धा कमी पडतो. त्यामुळे दरवर्षी वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडवून पाण्याचा साठा वाढविण्यावर भर दिला जात आहे. पारंपरिक पद्धतीने पाणी अडवून पाण्याचा साठा करुन बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी पुरविणे खूप गरजेचे असून त्यासाठी वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यातील (Forest dams) पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, गुरांना पिण्याकरिता, कपडे धुण्याकरिता, वनराई बंधाऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता मदत होते. तसेच वनराई बंधाऱ्याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्य, कलिंगड, तृणधान्य, गळीत धान्य सारखी पिके घेण्यासाठी मदत होते.
नाशिक विभाग राज्यात प्रथम
विभागात आजपर्यंत नाशिक 3 हजार 755, धुळे 608, नंदूरबार 1 हजार 340, जळगाव 431 असे एकूण 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहेत. राज्यात नाशिक कृषि विभागाने सर्वात जास्त वनराई बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून व लोकसहभातून पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.एका वनराई बंधाऱ्याद्वारे सरसरी 2 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय अधीक्षक कृषि अधिकारी तथा विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.
नाशिक मिशन भागीरथी प्रयास
नाशिक जिल्ह्यातील दरवर्षीचा दुष्काळ पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करणे हे दुःष्काळी गावातील चित्र पालटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा टँकरमुक्त करण्याचा संकल्प करत मिशन भागीरथी प्रवास हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जलसंधारणाची सुमारे सहाशे कामे घेण्यात आली आहेत. या कामांची रक्कम जवळपास शंभर कोटी रुपये असून या माध्यमातून पहिल्या टप्प्यात बारा तालुक्यातील 150 गावांमध्ये पाच ते 30 लक्ष रुपयांच्या दरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत.