Nashik Accidents : एकीकडे झिरो कॉरिडॉर (Zero Corridor) असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे नागपुरात (Nagpur) लोकार्पण होत असतांनाच दुसरीकडे मात्र राज्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरत असल्याचं बघायला मिळतय. नाशिक (Nashik) जिल्ह्यात अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून गेल्या 08 दिवसात 13 अपघातांमध्ये 19 जणांचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक आणि तेवढीच चिंताजनक बाब समोर आली आहे. 


नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) सिन्नरच्या मोहदरी घाटात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात (Accident) 5 जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या गाडीची अवस्था बघूनच खरं तर आपल्याला हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येईल. सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या अपघाताच्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय. या अपघातात 16 ते 17 वयोगटातील 5  महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय. पाच प्रवासी क्षमता असलेल्या स्विफ्ट डिझायर कार मधून आठ जण प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेल्या या कारचालकाचे नियंत्रण सुटून ही कार डिव्हायडर तोडून थेट दोन चारचाकी वाहनांवर पलटी झाली होती. 


दरम्यान या घटनेनंतर जिल्ह्यातील वाढते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू हा विषय चांगलाच चर्चेत आला असून गेल्या आठवडाभरातीलच आकडेवारी ही मन सुन्न करणारी आहे. 04 डिसेंबर ते 11 डिसेंबर या काळात 13 अपघातांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. शहरी भागात 7 अपघातांमध्ये 8 जण तर ग्रामीण भागात 6 अपघातात 11 जण दगावले आहेत. यामध्ये 04 डिसेंबर - सिन्नर - पिकअप चारचाकी पलटी होऊन 23 वर्षीय प्रवासी तुषार सहाणेचा मृत्यू. 04 डिसेंबर - पिंपळगाव - अज्ञात कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वत्सला मोगल या महिला ठार. 05 डिसेंबर - नाशिकरोड - ट्रकच्या धडकेत वडिलांसोबत सायकलवर जाणारा अमित दुर्वे हा चार वर्षीय बालकाचा मृत्यू. 06 डिसेंबर - उपनगर - छोटा हत्ती गाडीच्या धडकेत दुचाकीवरील 29 वर्षीय अभिषेक परदेशी ठार. 06 डिसेंबर - उपनगर - दुचाकीवरुन जातांना अज्ञात वाहनाच्या धडकेत 16 वर्षीय कृष्णा दुबे ठार. 08 डिसेंबर - नाशिकरोड - शिंदे गावाजवळ बस अग्नितांडवाच्या घटनेत दुचाकीवरील रवींद्र विशे आणि मदन साबळे या दोघांचा मृत्यू. 


त्यानंतर 08 डिसेंबर - उपनगर - अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दयाल परयानी यांचा मृत्यू. 08 डिसेंबर - सटाणा - मोटर सायकल अपघातात 61 वर्षीय तुळशीराम शिंदेंचा मृत्यू. 09 डिसेंबर - सिन्नर MIDC - सिन्नरच्या मोहदरी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारमधील पाच जणांचा मृत्यू. 09 डिसेंबर - म्हसरूळ - दुचाकीच्या अपघातात संतोष चारोस्कर या २९ वर्षीय युवकाचा मृत्यू. 09 डिसेंबर - नाशिकरोड - स्कॉर्पिओच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीवरील श्रीकांत साबळे यांचा मृत्यू. 10 डिसेंबर - सुरगाणा - चुकीच्या दिशेने आलेल्या चारचाकीच्या धडकेत प्रकाश बर्डे या दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू. तर कालच (11 डिसेंबर) सिन्नर परिसरात पुन्हा वावी - इनोव्हा कारच्या धडकेत दुचाकीवरील वैभव आणि सुवर्णा कुलकर्णी या मायलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 


नेमकी कारणं काय? 
वाहन चालवतांना वेगावर नियंत्रण नसणे, दारू पिऊन वाहन चालवणे, अधिक वेळ वाहन चालवणे, धोकेदायक पद्धतीने ओव्हरटेक/ लेन कटिंग करणे, प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे, गाडी चालवतांना मोबाईलवर बोलणे, ईतर वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा मानवी चुका अपघातांना कारणीभूत ठरत असून सरकारी यंत्रणा देखिल त्याला तेवढ्याच जबाबदार आहेत. महामार्ग पोलिसांचा कामचुकार पणा, कारवाई मध्ये केली जाणारी तडजोड, आरटीओ कडून फक्त कागदापुरतीच राबवली जाणारी मोहीम असे अनेक घटक याला जबाबदार आहे.


जिल्ह्यात 146  ब्लॅक स्पॉट 
मानवी चुका हे जरी अपघातांमागे एक कारण असले तरी दुसरीकडे मात्र रस्त्यांची रचना बघता कुठे उथळ तर कुठे खड्डे, अवाढव्य स्पीडब्रेकर्स, रस्त्यांच्या कडेला असणारे अडथळे, मधोमध असणारी धोकेदायक झाडं कारणीभूत आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण 146  ब्लॅक स्पॉट आहेत. एखादा मोठा अपघात झाला तर प्रशासनाकडून तात्पुरती काहीतरी कारवाई केली जाते, पालकमंत्र्याकडून सूचनांचे पाढे वाचले जातात, मात्र या अपघातांच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी कुठलीच ठोस उपाययोजना राबवली जात नाही. एकीकडे झिरो कॉरिडॉर असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे नागपुरात लोकार्पण होत असतांनाच दुसरीकडे मात्र रस्ते अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यात सरकारी यंत्रणा अपयशीच ठरत असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे.