Nashik News : नसबंदी (Sterilization) हा शब्द जरी ऐकला तरी पुरुष मंडळी काढता पाय घेतात. त्यामुळे आज देशात पुरुष नसबंदी करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र नाशिकच्या (Nashik) सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) याबाबत सकारात्मक गोष्ट घडली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी 126 पुरुषांनी नसबंदी केल्याची कौतुकास्पद गोष्ट घडली आहे. त्यामुळे परिसरातून या पुरुषांचे कौतुक होत आहे. 


गेल्या काही वर्षात भारताची लोकसंख्या खूपच वाढली आहे. समाज स्मार्ट झाला असला तरीही आजही अनेक रूढी परंपरा पाळल्या जातात. काही बाबतीतील समाजाची मानसिकता दुर्दैवाने आजही कायम आहे. यामध्ये पुरुष नसबंदी हा विषय आजही गौण मानला जातो. ज्याप्रमाणे मासिक पाळीबाबत आजही अनेक ठिकाणी गैरसमज पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने पुरुष नसबंदी बाबत समाजात गैरसमज असल्याचे दिसून येते. मात्र याला अपवाद ठरलेत ते सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील पुरुष. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील जवळपास  पुरुषांनी नसबंदी केल्याचे समोर आले आहे. 


नाशिकच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर यांचे मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरठाण तालुका सुरगाणा या आदिवासी भागातील अति दुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2 सप्टेंबर रोजी हा नाविन्यपूर्ण संकल्प करण्यात आला. तत्पूर्वी उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी अधिकारी यांनी जास्तीत जास्त पुरुष शस्त्रक्रिया एका वेळेस करण्याचा संकल्प केला. यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे तथा कुटुंब कल्याण नोडल अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करून  एकाच दिवशी उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील विविध गावांमधून 105 पुरुष शस्त्रक्रिया करण्यासाठी अपेक्षित लाभार्थ्यांची यादीनुसार त्यांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून योग्य असे समुपदेशन करण्यात आले तसेच लहान कुटुंबाचे महत्त्व विशद करण्यात आले.


126 पुरुषांची नसबंदी 
दरम्यान लाभार्थ्यांना नसबंदीबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर लाभार्थी यांची यादी करण्यात येऊन त्यानुसार नियोजन करून उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये एकूण 105 लाभार्थ्यांनी एकाच दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच त्यांना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक बक्षीसाचा त्यांना फायदा देण्यात आला.  याप्रसंगी उपस्थित लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे यांनी कुटुंब नियोजनाचे महत्त्व गरज तसेच पुरुष शस्त्रक्रियेचा कुटुंब कल्याण कार्यक्रमा मधला सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सुरगाणा तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज 21 पुरुष शस्त्रक्रिया करण्यात आल्या एकूण आजच्या दिवशी सुरगाणा तालुक्यामध्ये 126 पुरुष शस्त्रक्रिया करण्यात आली. 


कशी असते शस्रक्रिया 
पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या वीर्यनलिका कापून बांधल्या जातात.अंडकोशाच्या वरच्या भागात लहान छेद घेऊन ही नस बाहेर काढता येते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने निरोध वापरावा लागतो. कारण वीर्यकोशात साठवलेल्या शुक्रपेशी पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत दोन-तीन महिने जातात. ही काळजी घेतली नाही तर गर्भधारणा होऊ शकते.योग्य तऱ्हेने केलेल्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया जवळजवळ 100 टक्के परिणामकारक ठरतात. ही शस्त्रक्रिया केल्यावर शुक्रजंतू तयार होणे आणि संप्रेरके तयार होणे थांबत नसल्याचे तज्ञ सांगतात.