Nashik Anant Kanhere : स्थळ: नाशिकच विजयानंद थिएटर, मंगळावर 21 डिसेंबर 1909 तो दिवस. वेळ रात्री सव्वानऊची. शारदा या नाटकांसाठी प्रेक्षकगृह तुडुंब भरलेले. नाशिकचे (Nashik) कलेक्टर येणार म्हणून चोख पोलिसांचा बंदोबस्तही. थोड्याच वेळात नाटक सुरु झालं. अवघ्या काही मिनिटात ज्यांची पोलीस वाट पाहत होते, असे नाशिकचे कलेक्टर जॅक्सन (Collector Jackson) यांचं आगमन झालं. मात्र याचवेळी प्रेक्षकांतून उठून एका तरुणांन जॅक्शनच्या छातीत गोळ्या घालून ठार केलं. ताे तरुण म्हणजे हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे (Anant Laxman Kanhere). 21 डिसेंबर 2022 रोजी या घटनेला 113 वर्ष झाली, या निमित्ताने नाशिककरांनी अनंत कान्हेरे यांच्या बलिदानाची कथा अनुभवली. 


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अगणित भारतीयांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये महाराष्ट्रातील जॅक्सनचा वध महत्त्वाचा भाग आहे. दि. 21 डिसेंबर 1909 रोजी नाट्य मंदिरात कलेक्टर आर्थर टीपॅटस जॅक्सन याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या कटातील तीन क्रांतिकारक म्हणजे हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे, हुतात्मा विनायक नारायण देशपांडे आणि हुतात्मा कृष्णाजी गोपाळ कर्वे यांना 19  एप्रिल 1910 रोजी ठाण्यातील तुरुंगात फासावर देण्यात आले. 


दरम्यान 1909 च्या सुमारास नाशिक शहरात कलेक्टर म्हणून आर्थर टीपॅटस जॅक्सन कार्यरत होता. त्यातील प्रमुख घटना म्हणजे, त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करणारा अभियंता विल्यम्स याने एका शेतकर्‍याला कुठलाही गुन्हा नसताना फटक्यांची शिक्षा दिली आणि त्यातच शेतकर्‍याचा मृत्यू झाला. दुसरी घटना म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनी देशभक्तीपर काही गीते म्हटलीत आणि ‘वंदे मातरम’ चा जयघोष केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल झाला. त्यांना अंदमानला काळे पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवले. त्यांचे वकील पत्र स्वीकारणार्‍या खरे वकिलांना मानसिक रुग्ण म्हणून घोषित करून नाशिक मधून हद्दपार केले. सांगली मिरजेच्या तांंबे शास्त्रींच्या कीर्तन प्रवचनांच्या कार्यक्रमाला जॅक्सनने नाशिकमध्ये बंदी घातली.


नाशिक शहरात घडलेल्या या घटनांनंतर विल्यम्सला कुठलीही चौकशी न करता बढती म्हणून ठाणे येथे पाठवण्यात आले. नाशिककर न्याय मागण्यासाठी जॅक्सनकडे गेले, परंतु त्याने फक्त आश्वासन दिले. या घटना तरुणांच्या जिव्हारी लागल्या. त्याच दरम्यान नाशिक एका क्रांतीकारी गटाचे नेतृत्व कृष्णाजी कर्वे करत होते. त्यांच्या गटात विनायक देशपांडे, शंकर सोमण, वामन जोशी, गणू वैद्य यासारखे अनेक क्रांतिकारक काम करत होते. या सर्व क्रांतिकारकांच्या अनेक बैठका झाल्या, त्यात त्यांनी जॅक्सनला संपवले पाहिजे,असा निर्णय घेतला. जॅक्सनला संपवण्याचे काम कोण करणार? याविषयी चर्चा सुरू असताना गणू वैद्यने अनंत कान्हेरे च्या नावाचा उल्लेख केला. अनंत कान्हेरे हे औरंगाबाद येथे चित्रकला महाविद्यालयात शिक्षण घेत होते. 
 
औरंगाबाद येथे गणू वैद्य आणि अनंत कान्हेरे यांच्या भेटीमध्ये, कान्हेरेंनी जॅक्सनला मारण्याविषयी बोलून दाखवले. ठरल्याप्रमाणे कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांनी अनंताला औरंगाबादहून नाशिकला बोलावून घेतले. अनंताला आल्यानंतर पेठरोड कडील जंगलात बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले. रात्री झालेल्या बैठकीत अनंतला शपथ देण्यात आली. परंतु अनंत कान्हेरे यांच्या हाताला लागल्याने जॅक्सनला मारण्याची योजना पुढे ढकलण्यात आली. अनंता पुन्हा औरंगाबादला परत गेला. मात्र काही दिवसानंतर जॅक्सनची बदली होणार आणि तो नाशिक शहर सोडणार अशी बातमी नाशिक शहरात पसरली. 


सर्व क्रांतिकारकांना काळजी वाटू लागली, जॅक्सन आपल्या हातून सुटता कामा नये. अनंताला ताबडतोब बोलावून घेण्यात आले, येताना त्याच्याबरोबर त्याचे दोन मित्र नाशिकमध्ये आले. अनंताने त्या दोघा मित्रांना आपण काय करणार आहोत, याची कल्पना दिली नाही. जॅक्सनच्या बदलीनिमित्त पानसुपारी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या स्वागतासाठी विजयानंद नाट्यमंदिर येथे नाटकाचा कार्यक्रम होणार होता. दि. 21 डिसेंबर 1909, वार मंगळवार, रात्रीचे सव्वा आठ वाजले होते, प्रयोगाच्या वेळेस रंगमंचावर प्रसिद्ध कलाकार बालगंधर्व उपस्थित होते. नाट्य मंदिरात जॅक्सनचा प्रवेश झाल्याबरोबर अनंताने जॅक्सन वर गोळ्या झाडल्या, त्यात जॅक्सन मृत्युमुखी पडला. त्यादिवशी नाशिक शहरात प्रचंड धरपकड झाली. अखेरीस वयाच्या अठराव्या वर्षी अनंत लक्ष्मण कान्हेरे, विनायक नारायण देशपांडे वयाच्या 19व्या वर्षी आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे वयाच्या 23 व्या वर्षी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.