Nashik News : नाशिकमध्ये उद्योग विस्ताराला पोषक वातावरण असून, उद्योगांना आवश्यक असलेल्या  जागेची उपलब्धताही करुन देण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात दिंडोरी (Dindori), मालेगाव व येवला येथे ठिकठिकाणच्या ६२ उद्योगांनी तब्बल सात हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यातून आठ हजारांहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 


नाशिकच्या औद्योगिक विकासाला (Nashik Industrial Area) गती मिळत असून येणार्‍या काळात आणखी जागा उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शासनोच्या 2020 ते 2022 या दोन वर्षाच्या दरम्यान झालेल्या जागा वाटप बैठकींतून अतिरिक्त दिंडोरी औद्योगिक वसाहतीतील 9 लाख चौरस फूटाच्या 41 औद्योगिक प्लॉटवर सुमारे 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून सुमारे 5 हजार बेरोजगारांना नवे रोजगार निर्माण होणार असल्याने उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे. उद्योगांच्या विकासाला प्रशासनाच्या माध्यमातून गती देण्याचे काम सूर असून, दिंडोरीच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत सुमारे 9 लाख 931 चौरस मिटर जागांचे वाटप करण्यात आले असून, या माध्यमातून 5 हजार 901 कोटींची गुंतवणूक होेणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.


दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीत बहुतांश टेक्स्टटाइल उद्योगांकडून गुंतवणूक करण्यात आली आहे. या वसाहतीत नव्याने 28 प्रकल्प उभे राहत असून, 844 कोटींची गुंतवणूक आली आहे. त्यातून तीन हजार जणांहून अधिकांना रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. तर येवला येथे दोन प्रकल्पांद्वारे 120 कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, त्यातून 60 ते 70 जणांना रोजगार मिळणार आहे. 


नाशिकमध्ये उद्योग विस्ताराला पोषक वातावरण असून,उद्योगांना आवश्यक असलेल्या  जागेची उपलब्धताही करुन देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिकच्या उद्योग वाढीला गती मिळणार आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात मोठी गुंतवणूक झाली असून, त्यात अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. बहुतांश प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्याकडून बांधकामे व अन्य तयारी सुरू असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली आहे. 


या कंपन्यांची गुंतवणूक
तळेगाव अक्राळे (ता. दिंडोरी), अजंग-रावळगाव (ता. मालेगाव) व येवला अशा तीन ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींत ही गुंतवणूक होत आहे. तर नाशिक परिसरातील राजूर बहुला (144.43 हेक्टर), सिन्नर मधील मापारवाडी (230.67 हेक्टर), दिंडोरी मधिल जांबूटके येथेही अयोग्य उभारण्यात येणार आहे. तळेगाव अक्राळे येथे रिलायन्स लाइफ सायन्स (1206 कोटी), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (350 कोटी) या मोठ्या प्रकल्पांसह पिनॅकल इंडस्ट्रीज (54 कोटी), मॉन्टेक्स ग्लास फायबर (50 कोटी) या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.