Nashik News : यंदाच्या आषाढीवारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिक विभागातून 260 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती नाशिक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऐतिहासिक वारीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा वारीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.
आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे सहा हजार सातशे विशेष गाड्या सोडण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून देखील पंढरपूरला जाणा-या वारक-यांची संख्या मोठी असते. गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून एसटी प्रशासनाने तयारी केली आहे. आषाढीवारी निमित्त जादा गाड्या व गाड्यांच्या फेऱ्यातही वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात आषाढीवारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. गेल्या तीन-चार वर्षांतील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून 20 टक्के जादा गाड्या सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोना निर्बंध घातल्याने यंदा आषाढी एकादयासाठी विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी पंढरपूरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागातून पंढरपूरसाठी 260 बसेस सोडण्यात येतील, या दृष्टीने चालक वाहकांना सूचना देण्यात आल्याची माहिती नाशिक विभागाने दिली आहे.
एसटीला आर्थिक फटका
आषाढीला राज्यभरातून भाविक पंढरपूरला जातात. दोन वर्षांपासून कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी दूर राहावे लागले होते. यंदा परिस्थिती नियंत्रणात असल्याने भाविकांना दर्शन खुले करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होणार असल्याने नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊन व त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसला. यामुळे यंदा आषाढी वारीतून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असून या दृष्टीने एसटी महामंडळाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.