(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिक मनपाच्या शाळा होणार डिजिटल, स्मार्ट सिटी देणार शंभर कोटी
Nashik News : नाशिक (Nashik) शहराच्या मनपा हद्दीतील शाळा डिजिटल (Digital School) होणार असून यासाठी स्मार्ट सिटीकडून (Smart City) जवळपास १०० कोटींचा खर्च अपेक्षित असणार आहे.
Nashik News : नाशिक शहराच्या मनपा हद्दीतील शाळा डिजिटल होणार असून यासाठी स्मार्ट सिटीकडून जवळपास 100 कोटींचा खर्च अपेक्षित असणार आहे. नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून सध्या खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील महापालिकेच्या शाळांचा सर्व्हे सुरू आहे. त्यानंतर डिजिटल शाळांचा श्री गणेशा करण्यात येणार आहे.
अलीकडे राज्यात सर्वच शाळा डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. सोयीसुविधांनी युक्त शाळा विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावेल, त्यातून गळती थांबण्यास मदत होईल. त्याप्रमाणे राज्यात 'डिजिटल शाळा’ या संकल्पनेचा वटवृक्ष फोफावत आहे. तसेच महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये त्याचे अनुकरण चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने प्रगत शाळा या उपक्रमांतर्गत तंत्रस्नेही, ई-लर्निग, ई-क्लास या संकल्पनेवर भर दिला आहे. याच दरम्यान एक-एक जिल्हा परिषद संपूर्ण डिजिटल शाळा करण्याचा ध्येय ठरवून कामाला लागली आहे.
त्यातच आता महानगर पालिकेच्या शाळाही डिजिटल होण्याच्या मार्गावर असून मुंबईच्या धर्तीवर आता नाशिक मनपा हद्दीतील शाळा डिजिटल होणार आहेत. त्याच बरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी ‘एक ड्रेस कोड'चा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. थोड्याच दिवसात शाळा सुरु होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयक्त रमेश पवार डिजिटल शाळा करण्यासह गोदावरी प्रदूषण, महापालिकेचे आर्थिक सक्षमीकरण, शाळांचा दर्जा, स्वच्छता कर्मचारी यांच्या कामकाजात गतीमानता आणण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या टप्प्यात महापालिकेच्या शाळांचे कामकाज अधिक सक्षम करण्यावर आयुक्त भर देणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सगळ्या शाळांत स्मार्ट कामकाज सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी लक्ष घातले आहे.
अशी असणार डिजिटल शाळा
नाशिक महापालिकेच्या शाळांतील संगणकीकरण, इमारतीची डागडुजी, इंटर ॲक्टीव्ह स्मार्ट बोर्ड, सीसीटीव्ही आदी सुविधा देत महापालिकेच्या शाळांना स्मार्ट करण्याचे नियोजन असून यासाठी शाळांचा सर्व्हे केला जात आहे. प्रत्येक शाळातील एक संगणक कक्ष असेल. त्यात डिजीटल इंटरॅक्टीव्ह फलक असतील. नाशिक महापालिकेच्या 88 प्राथमिक, 13 माध्यमिक शाळांमध्ये कामकाजात व शैक्षणिक दर्जात सुधारणा होण्याच्या दृष्ट्रीने आयुक्तांनी पुढाकार घेत कामकाजाच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळेच महापालिका शाळांचे कामकाज अधिक गतीमान होणार आहे. या सगळ्या सुविधा देण्यापूर्वी महापालिकेला शाळांच्या इमारतीच्या सुरक्षेवर लक्ष द्यावे लागणार आहे.
शाळा डिजिटल व्हायला हव्यात, पण....
अलीकडे शाळा डिजिटल करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मात्र नुसत्या सरकारी कागदावर, निकृष्ट साहित्यांनी नि वरवरच्या हेतूने डिजिटल व्हायला नको. राज्यातील सुरुवातीच्या 25 टक्के डिजिटल शाळांचा अभ्यास केला असता काही वर्गवारी करता येते. फार कमी जणांनी डिजिटल यंत्रणा विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला पूरक साधन आहे म्हणून ते उभारले, हाताळले नि सांभाळले. त्यात सातत्य ठेवले. बऱ्याच जणांनी नवेपणा, शोभा, तंत्रांचा, तंत्रज्ञांना अतिरिक्त वापर या हेतूने डिजिटल शाळा करण्याचा ध्यास घेतला.