Nashik : औषधे आणि अमली पदार्थांचा नशेकरता गैरवापर रोखण्यासाठी संयुक्त कृती योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व औषधे विक्रेत्यांनी एक महिन्याच्या आत औषधे विक्रीच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, महिना उलटला तरी आतापर्यंत फक्त 50 टक्के औषध विक्रेत्यांनी सीसीटीव्ही लावल्याचे समोर आले आहे.
दरम्यान शेड्युल एक्स, एच आणि एच-1 औषधे आणि इन्हेलर विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या समोरच लावावी आणि दुकानांमध्ये महिनाभराच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावावे, असे आदेश जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिले होते. या आदेशानुसार गेल्या महिना भरापासून जिल्हा औषध नियंत्रण विभाग शहरासह जिल्ह्यांत तपासणी करत आहेत.
यानुसार, नाशिकमधील अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्हाभरातील औषध दुकानांना भेटी देऊन मालकांना त्यांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाभरात सुमारे 4,900 केमिस्ट आहेत. त्यामुळे आतापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयश आले असले तरी जवळपास 50 टक्के औषध विक्रेत्यांनी शॉपच्या दर्शनी भागात सीसीटीव्ही लावल्याचे तपासणी अंती समोर आले आहे. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील केमिस्ट आर्थिक अडचणींमुळे सीसीटीव्ही लावण्यात मागे असल्याचे दिसून आले आहे. तरीसुद्धा, औषध निरीक्षकांकडून लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. औषध निरीक्षकांनीही औषध विक्रेत्यांना ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या औषधांचे संगणकीकृत बिलिंग सुरू करण्याचे आवाहन केले जात आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय शेड्युल औषधांची विक्री रोखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची यादृच्छिक तपासणी करता यावी यासाठी जिल्हा प्रशासन औषधांच्या दुकानांवर सीसीटीव्ही बसवले जात आहेत.
दरम्यान, महिना उलटूनही अजूनही अनेक औषध विक्रेत्यांनी सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ग्रामीण विक्रेत्यांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडे पैशांची चणचण असल्याने सीसीटीव्ही बसवण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर यासंदर्भात विक्रेता संघटनेकडून मुदत वाढवून देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे हळूहळू का होईना संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही बसवले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नाशिक एफडीएचे सहाय्यक संचालक विजय जाधव म्हणाले, “आमचे औषध निरीक्षक नियमितपणे त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रातील फार्मसीला भेट देत आहेत. दरम्यान शहरातील 70-75 टक्के औषध विक्रेत्यांनी तर ग्रामीण भागातील 35 टक्क्यांपर्यंत हे प्रमाण आहे. तसेच आमचे निरीक्षक फार्मसी मालकांना आवाहन करत आहेत की त्यांनी लवकरात लवकर सीसीटीव्ही लावावेत. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या शिफारशीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय शेड्यूल औषधांची विक्री रोखण्यासाठी फार्मसीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.