नाशिक : एकीकडे 182 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाची जिल्ह्यात सांस्कृतिक ओळख आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सावानाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सुरवातीच्या वादानंतर जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम, कार्यकारिणी फुटून झालेली दोन पॅनलची निर्मिती, निवडणुकीत झालेला राजकीय हस्तक्षेप, मतमोजणीला झालेला गोंधळ असा सर्व कलहानंतर ही बहुचर्चित निवडणूक पार पडली. 


सार्वजनिक वाचनालयात सद्यस्थितीत पावणे दोन लाखांची ग्रंथ संपदा लाभलेल्या सावानात 50 हजार संदर्भ ग्रंथ, 10 हजार दुर्मिळ पोथ्या उपलब्ध आहेत. वाचनालय म्हणजे काय तर वाचनाची भूक भागवणे इतका साधा आणि सरळ उद्देश असतो. वाचनालय म्हणल्यावर तेथे पुस्तकांची खरेदी, प्रदर्शन, देवाणघेवाण असते. मात्र अलिकडच्या काळात अनेक वादामुळे वाचनालय चर्चेचा विषय ठरत आहे. सद्यस्थितीत वाचक कमी अन राजकीय वाचक अधिक असल्याचे दिसून येते. 


मात्र 182 वर्षांची परंपरा लाभलेल्या सावर्जनिक वाचनालयात कधी काळी पुस्तके बोलत होती. वाचकांशी हितगुज करत होती. त्यावेळी वाचक आणि लेखक वाचनालयाचा दुवा म्हणून काम करत होते. त्यावेळी निवडणूक ही निमित्त मात्र असत असे. म्हणजे काही ठराविक लोकांच्या हातात वाचनालय असल्याने सर्व खेळीमेळीत पार पडत असे. मात्र 2008 नंतर वादाची ठिणगी पडली अन त्यावेळी वाचनालय सांभाळत असलेले रहाळकर-भारद्वाज -जुन्नर यांच्यात दुफळी निर्माण होऊन वाद निर्माण झाले. 


सार्वजनिक वाचनालयाच्या इतिहासात प्रथमच असे घडले. मात्र तेव्हा काही जाणत्या विचारवंत, लेखक, साहित्यिकांनी मार्ग काढत, सांस्कृतिक ठिकाणी राजकीय अतिक्रमण नको, म्हणून राजकीय हस्तक्षेप थांबविला. थोडी पार्श्वभूमी पाहिली तर असे लक्षात येते कि, पूर्वी सभासद संख्या कमी असल्याने निवडणुकी खेळीमेळीत पार पडत असे. त्यामुळे आजच्या न पूर्वीच्या निवडणुकीत जमीन आस्मानचा फरक दिसून येतो. अलीकडच्या वर्षात सभासद संख्या वाढली. राजकीय हस्तक्षेप वाढला. परिणामी लोकांचा निवडणुकीबद्दल इंटरेस्ट वाढला. पूर्वी एका विशिष्ट समाजाचे वर्चस्व असल्याने निवडणुकीची गंधवार्ता नसायची. मात्र अलीकडे राजकीय पक्ष, संघटनांचा हस्तक्षेप वाढल्याने निवडणुकीची चुरस वाढली. 


दरम्यान, एवढी वर्ष खेळीमेळीत शांततेत सुरु असलेली निवडणूक यंदा बहुचर्चित झाली. म्हणतात ना, एखादी गोष्ट फार दिवस थोपवून धरता येत नाही, तसेच 'सावाना'चे झाले. अतिशय चुरशीच्या निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले. यंदाच्या निवडणुकीत सुरवातीपासूनच कलह पाहायला मिळाला. सावानाचे माजी अध्यक्ष दिवंगत विलास औरंगाबादकर यांच्या निधनानंतर गोंधळ सुरु झाला. त्यानंतर सावानाची निवडणूक घेण्यात आली. ती देखील वादात सापडली. अखेर काही महिन्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आणि हि निवडणूक प्रकिया पार पडली.  


विशेष म्हणजे निवडणुकीत प्रथमच दोन पॅनलची निर्मिती झाली. सभासद संख्या वाढली. निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाला. अनेक राजकीय नेत्यांनी सभासदत्व घेतले. त्यामुळे प्रथमच या निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त झाला. अनेक अदृश्य हात यामागे कार्यन्वित असल्याची भावना निवडणुकीतील उमेदवारांनी व्यक्त केली. 


त्यानंतर मतदान प्रक्रियेत नाशिकचे खा. हेमंत गोडसे, आ. माणिकराव कोकाटे, वसंत गीते, अशोक मुर्तडक, विजय करंजकर, शाहू खैरे, शेफाली भुजबळ आणि माजी नगरसेविका हिमगौरी आडके आदी राजकीय हस्तींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतमोजणीला झालेला सावळा गोंधळाने तर निवडणूक हास्यास्पद ठरते की काय असं वाटायला लागले. अखेर काही वादानंतर का होईना ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान निवडणुकीत ग्रंथालय भूषणने एकहाती सत्ता मिळवली. आता तीन ग्रंथमित्राच्या साहाय्याने सावाना ग्रंथालय नाशिकचे 'भूषण' ठरेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


आता निवडून आलेल्या पॅनलच्या माध्यमातून सावानाला झळाळी मिळणार का? मुळात झळाळी मिळण्यासाठी निवडून आलेले सदस्य वाचन प्रिय आहेत का? नाशिकरांपासून दुर्लक्षित असलेले सावानाच्या आतील म्युझियम खुले होणार का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: