Nashik Trimbakeshwer Mahashivratri  : तब्बल दोन वर्षांनंतर महाशिवरात्रीची (Mahavshivratri) जय्यत तयारी सुरु असून नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर समितिने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता जोतिर्लिंग ट्रस्टने सलग 41 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांसाठी दोन दिवस महाशिवरात्रीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. 


बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर (Trimbaekshwer) हे एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असुन निर्बंध शिथिल झाल्यापासून भाविकांच्या गर्दीचा ओघ आहे. दोन वर्षांपासून बंद असलेल्या शिव मंदिर यावर्षी भाविकांच्या अलोट गर्दीने भारावले आहे. शिवाय महाशिवरात्रीनिमित्त मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून दोन वर्षानंतर होणारी महाशिवरात्र महत्वाची असणार आहे. शनिवार रोजी महाशिवरात्र पर्वकाळ असून त्यानिमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर शनिवारी पहाटे 4 वाजेपासून रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहील. महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer Jotirlinga) देवस्थान तर्फे भाविकांना गायत्री मंदिराजवळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. 


दरम्यान महाशिवरात्री निमित्त भाविकांचा प्रचंड गर्दी होणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करुन सजविण्यात आले आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार, इ. ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून व त्याच्या दोन्ही विंग मधून करण्यात आली आहे. दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तातडीने दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन संपूर्ण दिवसभर सुरु राहणार आहे. देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनविण्यात आलेला आहे.


तीन दिवस कार्यक्रमाची रेलचेल 


महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे तीन दिवसांकरता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात  शुक्रवारी रोजी संध्याकाळी सहा ते रात्री साडे सात वाजेपर्यंत प्रसिद्ध सितार वादक पं. निलाद्री कुमार यांचा सितारवादनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत ओम नटराज अॅकडमी तर्फे कथ्थक नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. शनिवारी महाशिवरात्री निमित्त दुपारी दोन वाजता रा. स्व. संघ, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने घोष वादन, तसेच सायं. साडे पाच वाजता बासरी प्रशिक्षण वर्ग नाशिक यांचा समूह बासरी वादनाचा कार्यक्रम व सायं. साडे सात ते साडे आठ यावेळेत किर्तनकार ह.भ.प. चंद्रशेखर शुक्ल यांचा शिवस्तुस्ती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रविवारी सायं. सात ते नऊ यावेळेत पद्मविभूषण पं.  जसराज यांचे पट्टशिष्य पं. प्रसाद दुसाने यांचा सुगम संगिताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर सर्व कार्यक्रम हे श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटांगणात होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी मर्यादीत संख्येत शिवप्रेमींना प्रवेश देण्यात येणार आहे.


त्र्यंबकराजाच्या पालखीची भव्य मिरवणूक 


शनिवारी दुपारी 3 वाजता श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातुन निघून पारंपारिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त कुंडावर पुजा करुन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पालखी पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. तसेच श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे शनिवारी परंपरेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे भगवान श्री त्र्यंबकराजांची विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री बारा ते अडीच या वेळेत होणार आहे. ग्रामस्थांच्या दर्शनासाठीचे नियोजन हे फलकावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तरी भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी महाशिवरात्रीच्या उत्सवाचा आनंद घ्यावा व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


सिटीलिंकच्या जादा बसेस


सद्यस्थितीत सिटीलिंकच्या वतीने तपोवन आगरातून 15 बसेसच्या माध्यमातून 106 बस फेर्‍या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात तर नाशिकरोड आगारतून 10  बसेसच्या माध्यमातून 60 बसफेर्‍या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात. या नियमित बसफेर्‍यांचे नियोजन महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आले आहे. बसफेर्‍यां व्यतिरिक्त महाशिवरात्रीनिमित्त तपोवन आगारातून 6 बसेसच्या माध्यमातून 48 तर नाशिकरोड आगारातून ४ बसेसच्या माध्यमातून 32 अश्या एकूण 10 जादा बसेसच्या माध्यमातून 80 जादा बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. जादा 80 बसफेर्‍या व नियमित 166 बसफेर्‍या अशा एकूण 246 बसेस धावणार आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.