Nashik Lothe Ganapati : लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरु करण्याआधी नाशिकच्या (Nashik) रविवार कारंजावरील (Ravivar Karanja) लोथेंच्या गणपती मंदिरात (Lothe Ganesh) भाद्रपदाच्या सुरुवातीला गणेश व गौरी पूजन, माघी शुद्ध चतुर्थी ते वसंत पंचमीपर्यंत गणेश जन्म सोहळा साजरा केला जात असे. ते आजपर्यत ही परंपरा लोथेंच्या गणपतीने टिकवून ठेवली आहे. 


नाशिक (Nashik) शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरात अनेक भागात मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. शहरातील पुरातन असलेले फारसे परिचित नसलेले ब्रिटिशपूर्व काळातील उजव्या सोंडेचे गणपती देवस्थान अतिशय पुरातन असून त्याचे इतिहास व स्थान प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. नाशिक शहरातील रविवार कारंजावरील  गायधनी गल्लीच्या कोपऱ्यावरील बापाजी लोथे यांनी बांधलेल्या राहत्या घरातील कळस नसलेल्या मंदिर आजही सुस्थितीत आहे. 


नाशिकच्या रविवार कारंजावर गायधनी गल्लीच्या सुरुवातीला लोथेंच्या वाडय़ात उजव्या सोंडेचा गणेश रिद्धिसिद्धीसहित विराजमान आहे. लोथेंच्या गणपती संदर्भात निश्चित स्थापना सांगण्यात येत नही. मात्र आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार तीनशे ते चारशे वर्षापूर्वीचे हे मंदिर असावे. पेशवे काळात देवस्थानाबाबत विचारणा होऊन मूळचे वाशिमकर असलेल्या लोथे यांच्याकडे मंदिराची वहिवाटदारी आली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरु होण्याच्या आधीपासून लोथेंच्या गणेश मंदिरात गणेश जन्म सोहळा साजरा होत होता. बापाजी लोथे यांनी बांधलेल्या राहत्या घरामध्ये कळस नसलेले गणपती मंदिर असल्याबाबतचा उल्लेख आजही सरकारी दस्तऐवजात आहे. कालातंराने म्हणजेच 1988 मध्ये महापालिकेने केलेल्या रस्ता रुंदीकरणात मंदिराचा काही भाग गेला. त्यानंतर हे मंदिर पुन्हा गणेश मंदिरावरून नाव दिलेल्या गणेश भुवन वाड्यात आजही पाहायला मिळते. 


गणेश मूर्ती स्थापनेची आख्यायिका  
नाशिकच्या गोदाकाठ परिसरात आजच्या पेक्षाही तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी अनेक ड्यांत अज्ञात मंदिरे होती. त्यामुळे हजारो साधू महंत देखील या ठिकाणी वास्तव्यास होते. याच गोदाकाठावर असणाऱ्या एका साधू महाराज साधना करीत असताना अडथळा येऊ लागला. हे साधू महाराजा ज्या जागेवर बसलेले होते, त्या ठिकाणी स्थानिक मदतीने खोदकाम केले. खोदकाम केल्यानंतर त्यांना हल्लीच्या मंदिर असलेल्या ठिकाणच्या पुढील भागातून शुभ्र धवल आणि भरीव अशा पाषाणातील उजव्या सोंडेची चतुर्भुज अशी सोवळे नेसलेली व अर्थ पद्मासनात कमलपुष्पात बसलेली अत्यंत प्रमाणबद्ध अशी श्री गजानाची मूर्ती आढळून आली. त्यांनतर संबंधित जागेवर मूर्तीची स्थापना करण्यात आल्याचे आख्यायिकेत सांगितले जाते. 


अशी आहे लोथेंची गणेश मूर्ती 
 लोथेंचा गणेशाची पांढऱ्या संगमरवरी अखंड पाषाणात अत्यंत रेखीव गणेश मूर्ती घडवलेली आहे. कमळात पद्मासन घालून चतुर्भुज, शूर्पकर्ण गणपती बसला आहे. वरील हातात परशु आणि फुलं तर खालच्या डाव्या हातात अक्षमाला आणि उजवा हात वरद मुद्रेत आहे. उजवीकडील दात अर्धा असून डाव्या दाताकडून सोंड उजवीकडे वळली आहे. गळ्यात जानवे, माळा आहेत. कमळाजवळ गणपतीकडे पहाणारा उंदीर असून गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धीसिद्धी आहेत. मंदिरापुढे पेशवेकालीन हंडय़ा आणि भितींवर मोठमोठे आरसे लावले आहेत. लोकांना फारसा परिचित नसलेला हा गणपती उजव्या सोंडेचा असल्याने जास्त सिद्ध मानला जातो.