Nashik News : नाशिकच्या (Nashik) सिन्नर शहरात (Sinnar) धक्कादायक घटना घडली असून पुरातन वृक्षावरील घरटी हटविताना अनेक पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सिन्नर आशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिन्नर शहरातील बसस्थानकासमोर पंचवटी मोटेल्स (Panchvati Motels) या चांडक उद्योगाच्या हॉटेलच्या आवारात असलेल्या पुरातन चिंचेच्या वृक्षावरील घरटी हटविताना अनेक पक्षांचा बळी गेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे चिंचेचे झाड वाटसरूंना सावली तर पक्षांना आश्रयस्थान झाले होते. या चिंचेच्या झाडावर पाणकावळा आणि ढोकरी प्रजातीच्या पक्षांसह इतर पक्षांनी आसरा घेतला होता. मात्र यामुळे हॉटेल्स परिसरात पक्षांच्या विष्टेचा आणि झाडाच्या पानांचा त्रास होत होता.
याबाबत स्थानिक नागरिक असलेल्या तीन व्यक्तींनी वृक्षावर चढून वृक्षावरील घरटी हटविण्याचे काम सुरू केले. मात्र यात 103 पाण कावळा आणि 13 ढोकरी पक्षांचा मृत्यू झाला. तसेच झाडावर पक्षांनी उभारलेली घरटी जमिनीवर पडल्याने पक्षाची अनेक अंडी फुटली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळ गाठून तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये इम्रान शबीर सय्यद, सर्वर शकील शेख, सादिक शकील शेख अशी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत. संबंधितांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 कायद्या अंतर्गत प्रथम गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. तसेच सदर प्रकरणात एकूण 22 पक्षांना रेस्क्यू करून त्यांच्यावर वन विभागाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.
नाशिकमध्ये घडली होती घटना...
नाशिकच्या गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात अपार्टमेंटमधील रहिवाश्यांना पक्षांच्या विष्टेचा आणि झाडाच्या पानांचा त्रास होत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी येथील झाडांवर कुऱ्हाड चालविली होती. यामध्ये झाडावर वास्तव्य करणाऱ्या अनेक पक्षांची अंडी आणि जवळपास 15 बगळ्याचा मृत्यू झाला होता तर तीन बगळ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
पक्षीप्रेमींमध्ये संताप
दरम्यान अनेकदा शहर विकासाच्या नावाखाली वृक्षाची कत्तल करण्यात येते. अनेक ठिकाणी नवीन किंवा जुन्या बांधकामांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वृक्षाची विना परवानगी सर्रास कत्तल केली जात आहे. यापुढे शहर परिसरात झाड तोडताना झाडावर कुठल्याही प्रकारची जैव-विविधता नसल्याचा दाखला घेण्यात यावा. स्थानिक प्रशासन वन विभागाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.