Nashik Crime : येवला (Yeola) तालुक्यातील मुखेड शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलेच्या खुनाचा (Murder) उलगडा पोलीसांनी केला आहे.   तालुक्यातीलच सराईत गुन्हेगार असलेल्या संशयितांने खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 


नाशिक (Nashik) जिल्हा मागील दोन ते तीन दिवसांत खुनाच्या घटनांनी हादरला आहे. पंचवटी परिसरातील (Panchavati) खुनाचा उलगडा होतो न होतो तोच येवला तालुक्यातील खुनाच्या घटनेतील संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी वैभव आहेर याने दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी येवला तालुक्यातील मुखेड शिवारात नवीन कॅनल लगत असलेल्या शेतात त्यांची आई शेतीचे काम करत असतांना अनोळखी संशयितांने उपरण्याने गळा आवळून तिचा खून केला. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितास ग्रामीण पोलीसांची शिताफीने अटक केली आहे.


दरम्यान सदर खुनाची घटना घडल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथक नेमण्यात आले. त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळास भेट देवून घडल्या परिस्थीतीची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावर फॉरेन्सीक टीम व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.


त्यानंतर पोलीस पथकांनी तपास सुरू करून घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या संशयितांचे वर्णन केल्याप्रमाणे पोलीसांनी पुरावे शोधत निलेश भगवान गिते याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने शनिवारी सायंकाळी शेतात काम करत असलेल्या एका महिलेशी झटापट करून तीचा उपरण्याने गळा आवळून खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांत दिली. त्याचबरोबर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील कर्णफुले जबरीने चोरून नेल्याचे सांगितले. संशयित गीते याने घटनास्थळी वापरलेले कपडे व मोटर सायकल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेली आहे.


या प्रकरणातील संशयित निलेश गीते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध येवला पोलिसांत खून, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या दिवशी मुखेड गावचा आठवडे बाजार असल्याने यातील संशयित हा आठवडे बाजारात आला होता. सायंकाळच्या सुमारास तो दुचाकीने मुखेड गावाजवळील नवीन कॅनॉल रोडने जात असतांना, त्यास एक महिला शेतात एकटीच काम करत असल्याची दिसली. तेव्हा त्याने शेतात जाऊन सदर महिलेशी झटापट करून तीचा उपरण्याने गळा आवळून संपवलं व महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागीने जबरीने चोरून नेल्याची उघडकीस आले आहे.