Jalgaon News : नाशिकसह (Nashik) विभागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)  धुमाकूळ घातल्याने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात तर अनेक दिवसांपासून भाव मिळेल या आशेवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना हवा तास भाव कापसाला मिळालेला नाही. ही व्यथा  जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कवितेतून मांडली आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून कापूस उत्पादक (Cotton Growers) शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कापूस तर काढला, मात्र योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस तसाच घरात साठवून ठेवला आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी साठवलेल्या कापसामुळे आजारही उदभवल्याचे समोर आले होते. तरी देखील शेतकऱ्यांनी ही समस्या सहन करत योग्य भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी एका शेतकऱ्याने 'बळीराजाच्या घामाचा भाव लै सस्ता' ही कविता ऐकवली होती. यानंतर आता पाचोरा (Pachora) तालुक्यातील शेतकऱ्याने 'कापसाला मिळणं भाव, सरकार मायबापा शेतकऱ्याने आता काय करावं' अशा आशयाची एक कविता केली आहे. 


पाचोरा येथील वैभव महाजन (Vaibhav Mahajan) या शेतकऱ्याने आपल्या कवितेच्या माध्यमातून सरकारवरील आपली नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने लवकरात लवकर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळून द्यावा अशी मागणी आपल्या कवितेच्या (Farmer Kavita) माध्यमातून व्यक्त केली आहे. वैभव महाजन यांची ही कविता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणत कापसाची लागवड केली होती. मात्र यंदा कापसाचे भाव हे लागवड खर्चही निघत नसल्याच्या स्थितीत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या आशेने कापूस विक्री न करता कापूस घरातच ठेवणे पसंत केले आहे. यंदा कापसाला भाव देण्यात सरकार अपयशी ठरल्याचं अनेक शेतकऱ्यांना वाटत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सरकारवर मोठी नाराजी असल्याचं दिसून येतं आहे. 


शेतकरी दिवसभर ऊन असो की पाऊस असो, शेतकरी अहोरात्र काम करुन शेती पिकवतो, मात्र त्याच्या मालाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अवकाळीच्या संकटांनंतर नुकसान भरपाई मिळत नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा वैभव महाजन या तरुण शेतकऱ्याने कवितेतून मांडल्या आहेत. एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कापूस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस पाडवा होऊन गेला तरी घरातच आहे. भाव वाढेल या अपेक्षेने घरातच साठवलेला कापूस आता शेतकऱ्यांसाठी संकट बनला आहे. कारण, बाजारात विकावा तर भाव नाही अन् घरी ठेवावा तर नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येला जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शेतकरी वैभव चव्हाण यांनी कवितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. 


काय म्हटलंय कवितेत? 


वैभव महाजन यांनी ही कविता लिहली असून ते म्हणतात की,  स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनो, फिरून झाल्या असतील तुमच्या वाऱ्या, जरा शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घ्यायला बांधावर या', अनाथांच्या नाथा तुमचं चाललं असेल एकदम ओकेमधी, मग आमच्या कापसाला भाव कधी? असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे.