Nashik Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त ( (Ashadhi Ekadashi) राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाद्वारे (Nashik) पुरवण्यात आलेल्या बससेवेचा हजारो वारकऱ्यांनी लाभ घेतला. जिल्ह्यातील 54 हजार भाविकांनी पंढरपूर (Pandharpur) पर्यंतचा प्रवास केला यातून एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाला 95 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) पंढरीची वारी बंद होती. त्यामुळे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकले नाही. मात्र, यंदा कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने पंढरीची वारीला लाखो भाविक गेले होते. या पंढरीच्या वारीसाठी नाशिक जिल्ह्यातून 227 विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेमुळे पंढरीचा विठ्ठल नाशिक विभागाला पावला असून तब्बल 95 लाखांचे उत्पन्न झाले आहे.
कोरोनाचे दोन वर्ष सामान्य लालपरी आगारात बंद होती. त्यानंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेल्याने अनेक महिने कोरोना आटोक्यात आल्यानंतर बससेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. तर कोरोनामुळे दोन वर्ष भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे पंढरपुरात पोहोचून विठुरायाचे दर्शन घेण्याच्या सुखापासून त्यांना वंचित रहावे लागले, मात्र कोरोना संसर्गाचा धोका आटोक्यात आल्याने यंदा त्र्यंबकेश्वरहुन गेलेल्या पालखी सोहळ्याला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर अनेकांना वारीतून चालत जाणे शक्य नसल्याने अनेक वारकरी बसने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने भाविकांसाठी मोबिलक संख्येने बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.
तसेच यंदा एसटी महामंडळाकडून थेट भाविकांच्या गावातून बस सेवा पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. पंढरपूर वारीसाठी नाशिक जिल्ह्यातून 227 बसेस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या माध्यमातून नाशिक विभागाला 95 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर पंढरीच्या वारीतून एसटीला विठ्ठल पावला आहे.
54 हजार वारकऱ्यांचा प्रवास
दरम्यान नाशिक विभागाने आषाढी एकादशी साठी सुरू केलेल्या बसेस मधून जवळपास 54 हजार प्रवाशांनी पंढरपूरचे दर्शन घेतले. यामध्ये प्रौढ प्रवासी 37 हजार 96, जेष्ठ नागरिक 13,397 तर 3641 लहान मुलांनी एसटी महामंडळाचे बसेस मधून प्रवास करत पंढरपूर वारी केली. याबाबत नाशिकचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील म्हणाले की आषाढी एकादशीनिमित्त सुरू केलेल्या एसटी बसेसला महामंडळाच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंढरपूर मार्गावर 227 बसेसने सेवा पुरवण्यात आली. या बसेसच्या एकूण 912 फेऱ्या झाल्या यातून 95 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.