Nashik News : वेळोवेळी सूचना करूनही शहरातील अनेक खाद्य पदार्थ व्यावसायिक एकदा वापरल्या तेलात पुन्हा पदार्थ तळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) येथील अन्न व औषध प्रशासनाने गंगापूर रोडवरील (Gangapur road) एका आस्थापनेवर छापा टाकत कारवाई केली आहे. त्यामुळे संबंधित व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. 


अनेकदा आपणही घरात बाजारे, पकोडे तळत असतो. त्यावेळी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरत असतो. मात्र यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. असाच काहीसा प्रकार शहरातील खाद्य पदार्थ बनविणाऱ्या व्यावसायिकांकडे पाहायला मिळते. अनेकदा वापरूनही हि मंडळी पुन्हा त्याच तेलात खाद्य पदार्थ तळात असते. मात्र ग्राहकही तक्रार न करता निमूटपणे खात असतो. मात्र यावर चाप आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) सक्रिय झाले असून काही दिवसांपूर्वी तयांनी अशोक स्तंभावरील एका वडापाव आस्थापनेवर कारवाई केली होती. त्यानंतर काल सायंकाळी त्यांनी गंगापूर रोडवरील आंनदवल्ली परिसरात एका आस्थापनेवर छापा टाकून कारवाई केली आहे.  


दरम्यान एकदा वापरलेल्या खाद्य तेलाच्या वारंवार वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे व्यावसायिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले आहेत. आनंदवली परिसरातील एका आस्थापनेवर सोमवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून आरोग्यास अपायकारक ठरणारे तेल जप्त केले आहे. या तेलाची टीपीसी अंतराद्वारे तपासणी केली असता त्याचे रीडिंग 39.5 आले असून ते खाण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी काढला. 


टोटल पोलर कंपाउंड रीडिंग मीटर
दरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडे तेलाच्या गुणवत्ता तपासण्यासाठी मापक वापरले जाते. त्यास टीपीसी असे संबोधले जाते. खाद्यतेलाची टीपीसी टोटल पोलर कंपाउंड रीडिंग मीटर 25 च्या आत असल्यास ते तेल तळण्यासाठी योग्य असते, असा निर्वाळा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मात्र त्यापेक्षा अधिक रीडिंग आले असते ते आरोग्यास धोकादायक असते. गंगापूर ओरड येथील आस्थपनेवर टाकण्यात आलेल्या छाप्यात तपासणी करण्यात आली. यावेळी येथील तेलाचे रीडिंग 39.5 आल्याने तेथील खाण्याचा अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला. 


डॉक्टर काय सांगतात?
टीपीसी वाढलेले तेलाचे सेवनाने हृदय विकार, उच्च रक्त दाब, लहान मुलांमध्ये स्थूलपणा, मधुमेह असे गंभीर विकार आढळतात. स्वयंपाकाचे तेल एकदा वापरले की पुन्हा कधीही वापरू नये, कारण ते खराब व्हायला सुरुवात होते आणि तेलामध्ये ट्रान्स-फॅटी असिडचे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्यासाठी चांगले नाही. याशिवाय कोलेस्टेरॉल वगैरे समस्या वाढण्याची शक्यता आहे. अनेकांना घशात जळजळ, हृदयाशी संबंधित आजार देखील होतात. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहून वापरात असते ते योग्य आहे की नाही याची खात्री करून खाद्यपदार्थांचे सेवन करावे