Nashik News : मागील तीन दिवसांपासून मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे नाशिक (Nashik0 जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गंगापूर (Gangapur), कश्यपी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. तर त्र्यंबक (Trimbakeshwer) तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्र सीमेवर (Gujrat Maharashtra Border) दमण गंगेच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र दावलेश्वर देवस्थान (Davleshwer Temple) दमनगंगेच्या पुरात मनसोक्त बुडाले आहे. शिवाय या ठिकाणी असलेल्या ४५ फूट उंचीच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात गुजरात सिमेवर दावलेश्वर महादेव देवस्थान हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. स्थानिक परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेले हे स्थान गुजरातमधील दमणगंगा नदीकाठी असुन मंदीर परिसर तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणुन ओळखले जाते. दमणगंगा नदीच्या काठावर असल्याने सध्या दमणगंगा दुथडी भरू वाहत असल्याने हे मंदिर पाण्याखाली गेले असून हनुमानाच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पश्चिम पट्ट्यात त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा आदी भागात रस्ते खचले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. दरम्यान जून महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगलाच बरसत असून दावलेश्वर येथील प्रमुख नदी असलेल्या दमनगंगेला देखील पूर आला आहे. पुरात नदीकाठची आजूबाजूची शेती, दावलेश्वर येथील महादेव मंदिर जोतिर्लिंग, तसेच हभप वैकुंठवासी बापूबाबांचे स्मृतीसमाधी मंदिर पाण्यात होते.
दमणगंगेवर पुलाची मागणी
त्र्यंबकेश्वर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या दावलेश्वर भागातही हि महत्वाची नदी ओळखली जाते. यामुळे पावसाळ्यात स्थानिकांना पुराचा सामना करावा लागतो. शिवाय शेतीचेही नुकसान होऊन इतर ठिकाणचा संपर्क तुटतो यासाठी दमणगंगा नदीवर पुलाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. हा पुल झाल्यास पेठ, सापुतारा, वलसाड, गुजरात तसेच नाशिक, सटाणा, धुळे, नवापुर ते गुजरात नाशिक, त्र्यंबक, जव्हार, चारोटी नाका ते अहमदाबाद एक्सप्रेस हायवे मार्गे गुजरात तसेच त्र्यंबकेश्वर, हरसूल, दावलेश्वर मार्गे गुजरात या मार्गानेही वाहतूक करताना येणार आहे.
शेतीचे नुकसान
दरम्यान परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे दमणगंगेला पूर आला आहे. मंदिराच्या काठावर आजूबाजूला भात शेती मोठ्या प्रमाणावर असून पुरामुळे शेतात पाणी घुसले आहे. अनेक ठिकाणी भात आवणी झाली असल्याने रोपांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.