Sandhan Valley Closed : राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असल्याने नाशिक (Nashik) जिल्ह्यासह प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अशातच काही ठिकाणी पर्यटकांनी तोबा गर्दी केल्याचे आढळून आल्याने नाशिक वन्यजीव विभागाकडून (Nashik Wildlife Department) सांदण व्हॅली (Sandhan vally) पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून नाशिकसह भंडारदरा (Bhandardara) परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाळी पर्यटनाला पर्यटक गर्दी करत आहेत. खबरदारी चा उपाय म्हणून कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रद गावाजवळील सर्वात मोठी सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नाशिक वन्यजीव विभागाने घोषित केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटक पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. सांदण व्हॅली पर्यटकांकरिता आता थेट नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच अभयारण्यातील गड, किल्ले व धरणाच्या परिसरात रात्रीच्या मुक्कामावर आता बंदी घातली गेली आहे.
नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारित असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात सध्या अतीमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पर्यटनासाठी नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक अभयारण्यात पावसाळी सहलीसाठी दाखल होतात. मागील दोन वर्षांपासून कोराेनाच्या लाटेमुळे वर्षा सहलींवर निर्बंध होते. त्यामुळे यावर्षी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर भंडारदरा जवळील प्रसिद्ध असलेली सांदण दरी पर्यटकांसाठी येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आहे.
थेट कारवाईचा इशारा
सदरच्या अभयारण्याच्या परिसरात वनविभागाकडून नैसर्गिक धबधबे निश्चित केले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी इतर धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कळसुबाई परिसरात पर्यटकांनी केलेली गर्दी पाहता वन्यजीव विभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय अभयारण्याच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे बेभान व बीभत्स असे वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा वन्यजीव विभागाने दिला आहे. तसेच तपासणी नाक्यांवर तसेच पेट्रोलिंगदरम्यान तपासणी करताना मद्याच्या बाटल्या आढळून आल्यास वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.