Nashik News : नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik District) पावसाचा जोर कायम आहे. या पावसात जुन्या नाशिकमधील (Nashik) चार वाडे कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नसल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. मात्र पुन्हा एकदा नाशिक मधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


नाशिकमध्ये जुन्या वाड्यांची परंपरा आजही कायम आहे. मात्र दरवर्षी पावसाळयात वाडे कोसळण्याच्या घटना समोर घडत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या पूर्वी नाशिक मनपा प्रशासनाकडून संबंधित नागरिकांना व वाडे मालकांना याबाबत नोटिसा बजावण्यात येतात.त्यानुसार यंदाही धोकायदायक वाड्यांचे सर्वेक्षण करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र धोकादायक वाड्यातील नागरिकांनी वाडे खाली न करता वास्तव्य करत असल्याने मनपाकडून सूचना कऱण्यात आल्या होत्या. असे असताना काल दिवसभरात जुन्या नाशिकमधील चार वाडे कोसळले आहेत. 


गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील विविध भागातील चार वाडे कोसळले आहेत. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांकडून धोकादायक भागांची पाहणी करत वाड्यांचे काही भाग उतरून घेण्यात आला. नाशिक महापालिकेकडून जुने नाशिक भागातील धोकादायक वाड्यांना काही दिवसांपूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. वाडामालक आणि भाडेकरूंना धोकादायक भाग उतरवून घेण्याचा सूचना करण्यात आल्या तर अति धोकादायक वाड्यातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. असे असताना अद्यापही नागरिक धोकादायक वाड्यात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. 


दरम्यान दोन दिवसांपूर्वी बागवानपुरा, बडी दर्गा तसेच कुंभारवाडा परिसरातील धोकादायक घर आणि वाड्यांची भिंत कोसळण्याची घटना घडली होती. सोमवारी पुन्हा दिवसभरात चार वाडे कोसळले. शहरातील आसराची वेस येथील दोन धोकादायक वाड्यांच्या भिंतीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास कानडे मारुती लेन येथील कपोते वाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला. त्याच परिसरातील कानडे मारुती लेन हे मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तसेच व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


इथे वाडे कोसळले...!
दरम्यान वाड्या कोसळण्याची माहिती मिळताच महापालिका आणि भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पश्चिम विभागाच्या बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांनी धोकादायक भाग सुरक्षित रित्या उतरवून घेत त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास जुन्या तांबट गल्ली येथील कुंभकर्ण बंद वाड्याच्या एका बाजूचा संपूर्ण भाग कोसळला. तसेच रात्रीच्या सुमाराचे काही भाग कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान तीन वर्षांपूर्वी याच परिसरातील धोकादायक वाडा कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. हे चारही वाडे धोकादायक अवस्थेत असून महापालिका अधिकाऱ्यांकडून यापूर्वीही त्यांना नोटीस बजावण्यात आले आहेत. अद्यापही नागरिक या धोकादायक वाड्यात वास्तव्यास असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.