Sanjay Raut : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे भाजपचे मुख्यमंत्री असून त्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर (Delhi) आहेत. शिंदेचे हायकमांड दिल्लीत असल्याने कॅबिनेट ठरविण्यासाठी ते गेले असावेत अशी खरमरीत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली आहे.


खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज कार्यकर्ता मेळाव्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. आणि भाजपचे हायकमांड दिल्लीत असते. जर कोणी म्हणत असेल शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, तर शिवसेनेचे हायकमांड हे महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे, मातोश्रीवर असेही त्यांनी ठणकावून सांगितले.


ते पुढे म्हणाले की मंत्रिमंडळ ठरविण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीत जात नाही, गेला नाही.  मात्र आता राज्यात भाजपचे सरकार असल्याने सर्व गोष्टी दिल्लीवरूनच होतील. त्यामुळे थोडं थांबा सगळे मुखवटे गळून पडतील, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.


मराठी माणसावर अन्याय वाढला
आता एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कडून राज्याच्या अपेक्षा आहेत. सध्या सीमा भागात पुन्हा एकदा अत्याचार वाढण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भातील बातम्या देखील येऊ लागल्या आहेत. आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत, बेळगाव कर्नाटक सीमा भागावरील मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे, मुख्यमंत्री भाजपचे असल्याने त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा अशी मागणी मांडायला हवी आणि तो निर्णय घेऊन महाराष्ट्रात यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.



मुंबईचे तीन तुकडे!
राज्यात भाजप प्रणित सरकार आहे. मात्र एकेकाळचे शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईकडे लक्ष द्यावे. मुंबईचे उद्योग, ऑफिसेस सगळं पळवल जात आहे. शिवाय मुंबईचे तीन तुकडे करण्याचा यांचा मानस आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष द्यायला हवे, असेही संजय राऊत म्हणाले.