Nashik Crime : नांदगाव (Nandgoan) तालुक्यातील ढेकू येथे आईनेच सुपारी देऊन आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेतील संशयित आई व सहकारी व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकू या छोट्याशा गावात ही चीड आणणारी घटना घडली आहे. येथील जनाबाई अप्पा पेंढारे यांनी आपल्या मुलाच्या मानसिक आजाराला कंटाळून जनार्दन अप्पा पेंढारे यांची हत्या (Murder) करण्यासाठी संशयित समाधान दौलत भड यास सुपारी दिली होती. जनार्दन अप्पा पेंढारे हे मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने त्यांच्या मानसिक विकृतपणापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी समाधान भड यास पंधरा हजार रुपयांची सुपारी देण्यात आली. 


सदर संशयिताने 7 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जनाबाई अप्पा पेंढारे यांच्या घरातील लोखंडी पहारीने वार करून गंभीर जखमी करत खून केला. तसेच त्याचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत भरून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने स्थानिक विहिरीत फेकून दिला. स्थानिक शेतकऱ्यांना मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेचा तपास करण्यात आला.


काही वेळात खुनाचा उलगडा
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवडकर व पाटील, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, हवालदार सांगळे यांच्यासह पथक दाखल झाले. पोलीस पथकाने काही वेळातच घटनेचा छडा लावला. संशयित समाधान भड आणि जनाबाई पेंढारे यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. दोघांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.