Nashik Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील हरसुल (Harsul) जवळील शिरसगाव मुरंबी रस्त्यावरील शिरसगाव नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पुलाचे बांधकाम अद्यापही संत गतीने सुरू आहे. सध्या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने या नदीला पूर आला आहे. त्यामुळे ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांना या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.


नाशिकच्या त्र्यंबक (Trimbakeshwer) तालुक्यातील हरसुल जवळील शिरसगाव मुरंबी रस्त्यावरील शिरसगाव नदीवर नव्याने पुलाचे कामकाज सुरू आहे. मात्र हे कामकाज अतिशय संत गतीने सुरू असून अपूर्ण कामामुळे आता स्थानिक नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शिरसगाव नदीला पूर आला आहे. यामुळे पुलाच्या कामामुळे बनवण्यात आलेला पर्यायी मार्ग बंद तर झालाच आहे, मात्र पुलाचे काम अपूर्ण असल्याने वाहतूक बंद आहे. विशेष म्हणजे आता ये जा करण्यासाठी यास्थानिक नागरिकांनी बांधकामावरील फळ्या टाकून ये जा करीत आहेत. 


हरसुल भागातील शिरसगाव मुरंबी रस्ता हा मुख्य रस्ता असून भागोळ बाला पाडा आदी परिसरात जाण्यासाठी हा महत्वाचा रस्ता आहे. सदर नदीपात्र मोठे असल्याने पुलाला मंजुरी देण्यात येऊन कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र जानेवारीमध्ये उद्घाटन झालेले पुलाचे काम अद्यापही सुरूच आहे. अशातच पाऊस सुरू झाल्याने नदीला पूर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे तर विद्यार्थ्यांसह नागरिकांना या अपूर्ण पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.


हाकेच्या अंतरासाठी मोठा फेरा


दरम्यान या पुलामुळे हाकेच्या अंतरावरून जाण्यासाठी दहा-पंधरा किलोमीटरचा फेरा करावा लागतो आहे. रात्रीच्या सुमारास गाव पाड्यात एखादी दुर्घटना घडल्यास अथवा प्रसूती कामी किंवा विषबाधा, सर्पदंश यासारख्या घटनांसाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. मात्र अद्याप या पुलाचे कामच पूर्ण न झाल्याने ये जा तरी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. 


बांधकामाच्या फळ्या टाकून प्रवास


गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे नदीला पूर आला आहे. पुलाच्या बांधकाम सुरू असल्याने वाहने व नागरिकांना ये जा करण्यासाठी पर्यायी मार्ग बनविण्यात आला होता. मात्र आता आलेल्या पुरामुळे हा पर्यायी मार्ग बंद झाला असून विद्यार्थी व नागरिक बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून फळ्या टाकून ये जा करीत आहेत.