Maharashtra cabinet Expansion : आपल्या डॉक्टरकीचा उपयोग नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आदिवासींच्या उत्थानासाठी करणारे आणि घरातूनच समाजसेवेचे बाळकडू प्राप्त झालेले, सध्या भाजपमध्ये (BJP) असलेले आणि 2000 सालापासून आमदार म्हणून निवडून येत असलेले डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांची पुन्हा कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आदिवासींच्या सेवेसाठी गावितांना मंत्री मंडळात स्थान देण्यात आले असल्याने आदिवासी समाजाच्या सेवेसाठी संधी मिळाली आहे.
गावित यांचा परिचय
डॉ. विजयकुमार गावित यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील नटावद या छोट्याशा गावी 22 जुलै 1955 साली झाला. वडील शिक्षकी पेशात असल्याने संस्काराचे बाळकडू घरातून मिळाले. वडिलांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडून येत काँग्रेसला धूळ चारली होती. त्यामुळे डॉ. गावितांकडे हळुवार राजकीय वारसा आला. शिवाय डॉ. गावितांनी एमबीएबीबीएसचे शिक्षण घेत वैद्यकीय क्षेत्रातही ठसा उमटवला आहे.
राजकारणात प्रवेश
डॉ. विजयकुमार गावित यांच्या वडिलांना पंचक्रोशीत कृष्णा गुरुजी म्हणून ओळख होती. त्यांनी राहत्या ठिकाणी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या माध्यमातून डॉ. गावितांची जडणघडण होत गेली. आदिवासींसाठी काम करत असताना त्यांच्या वडिलांना 1990 च्या निवडणुकीचे जनता दलाचे तिकीट मिळाले. कृष्णा गुरुजींनी या निवडणुकीत प्रस्थापित काँग्रेसला धूळ चारली. तेथूनच खऱ्या अर्थाने गावित कुटुंबीय राजकारणात उतरले. आणि 1995 च्या सुमारास डॉ. विजय कुमार गावित नंदुरबार विधानसभेची निवडणूक लढवली आणि राजकीय कारकिर्दीची पायाभरणी झाली.
राजकीय कारकीर्द
डॉ. विजय कुमार गावित राजकीय वारसा नसला तरी त्यांच्या वडिलांना आदिवासी समाजासाठीच योगदान असल्याने त्यांना जनता दलाकडून तिकीट मिळाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने गावित कुटुंबात राजकीय वारसा सुरु झाला. त्यानंतर हळहळू डॉ. गावित हे देखील राजकारणात रमू लागले. वडिलांच्या सोबत आंदोलने, निदर्शने आदी ठिकाणी सहभागी घेतला. त्यांनतर 1995 नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजय मिळवला. पहिल्यांदा युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर डॉ. गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2000 ते 2014 सलग नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर 2014 राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करीत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजय. संपादन केला. पुन्हा 2019 च्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपा कडून विजयी झाल्यानंतर यंदाच्या शिंदे सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आदिवासी विकास विभागात मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत.
गावित कुटुंबीय राजकारणात सक्रिय
दरम्यान डॉ. विजयकुमार गावित यांच्यानंतर त्यांचे कुटूंबीय देखील राजकारणात सक्रिय असून त्यांची मुलगी डॉ. हिना गावित या खासदार आहेत. दुसरी कन्या सुप्रिया या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सदस्या झाल्या आहेत. त्यांची पत्नी कुमुदिनी गाविता या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांचे बंधू शरद गावित हे माजी आमदार असून शरद गावित यांचा मुलगा प्रकाश गावित हा देखील उमेदवार होता.
वैद्यकीय व्यवसायात तरबेज
डॉ, विजयकुमार गावित यांचे वडील शिक्षक असल्याने घरातून त्यांना शिक्षणाचे बाळकडू मिळाले. त्यानुसार त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत एमडी पदापर्यंत पोहचले. राजकरणात वावरताना त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा पुरेपूर वापर केला आहे. कोणत्या रोगावर कोणते औषध द्यायचे, याच संपूर्ण ज्ञान त्यांच्याजवळ असल्याने ते नेहमी राजकारणातून वेळ काढत आदिवासींची सेवा बजावत असतात. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तळागाळात वास्तव्य करणाऱ्या आदिवासींपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे नव्याने मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून येथील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणतील, अशी अपेक्षा येथील जनतेला आहे.