Nashik Leopard News : नाशिक (Nashik) शहरातील म्हसरूळ (Mhasrul) परिसरातील मोराडे मळ्यात वास्तव्य करणाऱ्या तरुणावर बिबट्याने (Leopard) झडप घेत हल्ला केला. या हल्ल्यात तरुण किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Nashik city Hospital) उपचार करण्यात येत आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह शहर परिसरात बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्याच्या तसेच दर्शनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील मोराडे वस्तीवरील थाळकर कुटुंबातील तरुणावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात भारत थाळकर हा तरुण जखमी झाला आहे. त्याने वेळीच प्रतिकार केल्यामुळे बिबट्याने या ठिकाणाहून धूम ठोकली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 


बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. नाशिक शहराजवळ म्हसरूळ शिवारात मोराडे मळ्यात थाळकर कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारच्या रात्री कुटुंब गाड झोपेत असताना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या भारतवर बिबट्याने हल्ला चढवला. यावेळी बिबट्याने त्याचा हात जबड्यात धरत फरपटत नेले. भारत गाढ झोपेत असल्याने सुरवातीला त्याला समजले नाही. बिबट्याला पाहताच त्याने आरडाओरड करण्यास सुरवात केली. मात्र कुटुंबीय गाढ झोपेत असल्याने कुणीही बाहेर आले नाही. त्यावेळी भारतने प्रसंगावधान राखत चुली जवळ असलेल्या लोखंडी फुकणीने बिबट्यावर हल्ला चढवला. यानंतर बिबट्याने जबड्यात धरलेला त्याचा दुसरा हात सोडत पळ काढला. 


दरम्यान, भारत थाळकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शहरात सातत्याने होत असलेल्या बिबट्याच्या घटनांनी शहर परिसर भयभीत झाला आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या सातपूर परिसरात एका घरात बिबट्याने मुक्काम ठोकला होता. वर्दळीचे ठिकाण असल्याने बिबट्याला रेस्क्यू करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे नाशिक शहरात बिबट्या वास्तव्य समीकरण झाले आहे. 


नाशिक शहर परिसरासह आळंदी धरणाचा परिसर बिबट्याचा कॉरिडोर आहे या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने वनविभागाकडून वाडी वस्तीवरील रहिवाशांना सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. रात्री अंगणात पुरेसा प्रकाश अशी याची व्यवस्था करावी, पशुधन सुरक्षित रित्या बंदिस्त जागेत ठेवावे. अंगणात किंवा पडवीत झोपू नये असे आवाहन नाशिकचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी केले आहे