Nashik Suicide : नाशिक (Nashik) शहरात दिवसेंदिवस आत्महत्यांचे (Suicide) प्रमाण वाढत चालले आहे. यात तरुण मुलं मुलींसह व्यावसायिक, विवाहित महिला आदींचा समावेश आहे. आता नाशिकच्या पंचवटीत (Panchavti) राहणाऱ्या एका कारखाना मालकाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या  घटनेने पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणारे रोशनलाल गोयल यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळीबार करून घेत जिवंत प्रवास संपवल्याची घटना घडली आहे. मूळचे हरियाणा (Hariyana) राज्यातील रहिवासी असलेले गोयल यांचा जानोरी येथील कामधेनु नावाचा कारखाना चालवितात. या ठिकाणी ते आपल्या पत्नी व मुलासह राहतात. आणि कारखान्याचे काम पाहतात. शनिवार नेहमीप्रमाणे मुलगा सुमित सकाळी कारखान्याकडे निघून गेल्यानंतर घरी गोयल पती पत्नी होते. दुपारी गोयल हे त्यांच्या बेडरूम मध्ये असताना त्यांनी रिवाल्वरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. 


दरम्यान गोळीबाराच्या आवाजाने भेदरलेल्या त्यांच्या पत्नी उषादेवी यांनी त्यांच्या बेडरूमकडे धाव घेत दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा गोयल यांनी आतमधून बंद केलेला होता. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती मुलगा सुमितला फोन करून दिली. त्यानंतर आडगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनंतर आडगाव पोलिसांना घटनेचा पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजारपणातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आडगाव पोलिसांनी वर्तवला आहे. 


कौटुंबिक वादातून आत्महत्या?
रोशनलाल गोयल हे उद्योजक होते ते गेल्या काही वर्षापासून नाशिकला स्थायिक झाले होते. त्यांच्या दोन मुली बंगलोर येथे वास्तव्यास असून हे तिघेजण नाशिकला राहत होते. दरम्यान गोयल यांना मद्याचे व्यसन होते. यावरून दोघं नवरा बायकोत भांडण होत असे. मात्र गोयल यांची पत्नी काही दिवसांकरिता लग्नानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. त्या दोनच दिवसांपूर्वी शहरात आल्या. त्यांनतर पुन्हा व्यसनावरून भांडणे झाली. तसेच अनेक वर्षांपासून गोयल हे नैराश्यात असल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.