August 15 : जिल्ह्यातील अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान आणि त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Swatantrya Amrit Mahotsav) आपण ‘याची देही, याची डोळा’ अनुभवतो आहोत, हे सर्वांचे भाग्य आहे. नाशिकच्या (Nashik) जनतेने या चळवळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग घेऊन स्वातंत्र्याप्रती आपली श्रद्धा सिद्ध केली व त्यात यश मिळवले, असे प्रतिपादन राज्याचे ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन (Minister Girish Mahajan) यांनी केले.
नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात (Nashik Divisional Office) आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्धापनदिनाचे ध्वजारोहण मंत्री गिरीष महाजन यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी आपल्या मंत्री महाजन बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरण.डी, महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री गिरीष महाजन पुढे म्हणाले की, नाशिकच्या जनतेने देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले होते. प्रत्येकाला आस होती ती फक्त स्वातंत्र्य प्राप्तीची. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे, तात्या टोपे यासारख्या क्रांतीकारी विभुतींच्या रुपाने इतिहासाने याची नोंद ठेवली आहे. नाशिकच्या जनतेने स्वातंत्र्य लढ्यात आपले देशकार्य अगदी नेटाने केले. याच काळात नाशिकमध्ये देशप्रेम, स्वातंत्र्य या भावनांचाही प्रचार व प्रसार झाला. अभिनव भारतासारख्या क्रांतीकारी संघटनांचा उदय व विकास नाशिक परिसरात झाल्याने नाशिक एक क्रांतीकारकांचे केंद्र म्हणून नावारुपास आले.
स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच्या अनेक घडामोडी देशासह महाराष्ट्रात आणि नाशिक मध्येही घडल्या. आहेत त्यामुळे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतांना आज प्रत्येक गाव, शहर, जिल्हा संपूर्ण देश तिरंग्यातून न्हाहून निघत आहे, अशी भावना मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केली.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक चळवळींचा जन्म
साधु-संतांची पावनभूमी, पवित्र तिर्थक्षेत्र, दक्षिण काशी म्हणून नावलौकिक असलेला आपला नाशिक जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक अशा विविध पंरपरेने नटलेला आहे. आधुनिक काळात तर नाशिक हे औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर नावारुपाला आले आहे. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशी अखंड ऐतिहासिक पंरपरा लाभलेल्या या नाशिक जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील महत्वाची भुमिका पार पाडलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध संस्थांच्या व सुधारणांच्या दृश्य, अदृश्य स्वरुपातून अनेक चळवळींचा जन्म झाला. या चळवळींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध नाशिककरांशी आल्याने त्यांनीही यामध्ये आपला सहभाग नोंदवला, असल्याचे मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकच्या इतिहासातील ‘सुवर्णपान’
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही हे ठासून सांगणारे वि. दा. सावरकर हे नाशिकचे भुषण आहे. भगूर येथे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचे स्मारक आहे. तेथे माननीय केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच या जिल्ह्यातील ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली आहे. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ ही मातृभुमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकच्या इतिहासातील ‘सुवर्णपान’ आहे, असेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्य चळवळीत कलेक्टर जॅक्सनची विजयानंद थियटरमध्ये हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे नाशिकच्या क्रांतीकारकांच्या इतिहासातील महत्वाचे क्रांतीकारक आहेत. प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा ध्वज फडकविण्यात हुतात्मा कान्हेरेंचा मोलाचा वाटा आहे. आज आपण जी ‘हर घर तिरंगा’ मोहिम अभिमानाने राबवतो आहोत या मोहिमेला हुतात्मा अनंत कान्हेरेंच्या इतिहासाची अमृतगाथा लाभली आहे.
ब्रिटिश राजसत्तेला हादरे देणारे, नव्हे त्यांना सळो की पळो करुन सोडणारे क्रांतीकारी तात्या टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवल्याचा. तात्या टोपेंच्या जन्मभूमी येवला येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी केंद्र सरकारने रूपये 10 कोटी 90 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला असून, येवला तालुक्यातील बाभुळगांव येथे 3.50 हेक्टर आर. जागेवर हे स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. तसेच येत्या काळात देशाला भ्रष्ट्राचार मुक्त करुन येणाऱ्या युवापिढीला अधिक सक्षम करण्यासाठी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना संधी नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.