Nashik News : एकीकडे गोवरची (Gover) रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने 15 डिसेंबर पासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) जिल्हा परिषदेच्या (ZP) आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शहरात व ग्रामीण भागात सर्व आरोग्य संस्थान मार्फत दिनांक 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
दरम्यान मागील काही महिन्यात मुंबई (Mumbai) नंतर जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) गोवरचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मालेगाव मध्ये जवळपास 71 रुग्ण आढळून आले होते. तर दुसरीकडे नाशिक महापालिका क्षेत्रात पाच रुग्ण आढळले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी नियंत्रण मिळविण्याचे आवाहन आरोग्य विभागापुढे होते. त्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला. दरम्यान येत्या 15 डिसेंबर पासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अमिता मित्तल यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल कुमार नेहेते यांच्या सनियंत्रणामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात घरोघरी जावून सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले असून आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात येत आहे. रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात सर्दी, खोकला, ताप यासह अंगावर पुरळ असणाऱ्या रुग्णांना औषधोपचार दिला गेल्याने परिस्थिती नियंत्रणास येण्यास मदत झाली. गोवरचे सध्या 50 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे. ग्रामीण भागातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्र व 592 आरोग्य उपकेंद्र स्तरावरून ही मोहीम राबविण्यात येणार आहे यामध्ये डिसेंबर महिन्यात गोवर प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस तर 15 ते 25 जानेवारी या कालावधीत दिल्या जाणार असून 10 दिवसाच्या दरम्यान दुसरा डोस देण्यात येणार आहे त्यां संदर्भात नियोजन आखण्यासाठी शहर जिल्ह्यातील 9 ते 12 आणि 16 ते 24 वयोगटातील मुला मुलींची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील पहिला डोस 2778 व दुसरा डोस 2684 लाभार्थींना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 518 लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरातील आपल्या परिसरातील नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून गोवर च्या प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना गोवरची लस टोचून घ्यावी व जिल्ह्यातील लसीकरण हे शंभर टक्के पूर्ण करणे कामी सर्वांनी आरोग्य विभागास करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती असीमा मित्तल तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात, डॉ युवराज देवरे, यांनी केले आहे.
पुन्हा एकदा लसीकरण मोहीम
विशेष मागील दोन वर्ष कोरोनाशी झुंज देत असताना आरोग्य विभागाची लसीकरण यंत्रणा सतत कार्यान्वित होती. गोवरच्या निमित्ताने पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. गोवरने लहान मुलांना विळखा घातला असून हा विळखा सोडविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग झोकून काम करत आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, आशा या सर्वानी संशयित बालकांचे सर्वेक्षण करून नोंदी घेतल्या आहेत. त्यानुसार हे लसीकरण करण्यात येणार आहे.