Ashadhi Wari 2022 : 'अरे भाऊ दोन वरीस, काय करू, कस करू अस झालं व्हत', कोरोनाचा आम्ही भीत न्हाय, आमच्या पाठीशी जोवर इठुराया हाये, तोवर वारी करणारच, अशा भावना वारीतल्या मायमाऊल्यानी व्यक्त केल्या.
संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे आज उत्साहात प्रस्थान झाले. यावेळी हजारो वारकऱ्यांनी दिंडीत सहभाग होता. तसेच विठुरायाची आस लागलेली माय माऊली 'हरिनामाचा गजर' करीत दिंडी सोबत चालू लागली.
संत निवृत्तीनाथ मंदिर परिसर दिंड्यानी हरखून गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी डोक्यावरचा पदर मागे घेऊन परभणीच्या यमुनाबाई चिमटे म्हणतात, 'जवा कळाल, यंदा पायी वारी जाणार म्हणून, महिन्यापासून तयारीला लागले, अन आज सगळं घरदार सुनाच्या भरवशावर ठेवून वारी आलेय. लग्न होऊन लय वर्ष झाली, पण माहेरी जायला मिळायचं न्हाय, पण आता वारीला जातेय, वाटतंय की माहेरलाच जातेय, बाप इठुरायाला मन भरून पाहणार आहे. असं त्या आवर्जून सांगतात.
नाथांची पालखी निघायच्या काही वेळापूर्वी पिंपळगाव घाडगा येथील राजाराम देवगिरे मिरचीचा अन बाजरीची भाकरी खाता खाता भजन म्हणत होते, ते म्हणाले 'पोरा चौथीच वारीय, पण अस वाटतंय की लय वर्षांपासून वारीला जातोय, दोन वर्षांनंतर जातोय, इठूरायाला डोळे भरून पाहणार, लय आनंद झालाय, विठुरायाकड आम्ही काय मागणार, ही चटणी भाकरी त्याच्याचमुळ.. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
बाजूलाच बसलेल्या निफाड तालुक्यातील 'गीताबाई डेमसे सांगतात 'दोन दिस झालं, पायाला लागलं, चालता येत नाही, घरचे म्हणत व्हते जाऊ नको, पण मी हट्टच धरला, जायचं म्हंजी जायचं' मह्या बापाकडे चाललेय, तो बरोबर करील समदं' जशी घरच्यांची खत (एक प्रकारे आठवण) वाटती, तशी खत इठुरायाची वाटू लागलीय, म्हणून चाललेय'.... आता निघालेय त मोठ्यानं भजनं म्हणते, इथं माझ्या ओळखीचं कुणीच नाही, पण समदे ओळखीचेच वाटत्यात.” तर जनाबाई बोराडे या रामकृष्ण डावरे महाराजांच्या दिंडीसोबत वारीला निघाल्या आहेत. संत निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत पंढरपूरला निघालेली ही सगळी मंडळी जेवण खावन करीत होती होती, तर कुणी पालखीत जाण्यासाठी आवराआवर करत होतं.
एकूणच दिंडीतल्या बहुतेक अनेक बायका एरवी घर, संसार, मुलं सांभाळणं, सासरच्यांच्या मर्जीनुसार वागणं आणि वर शेतातही राबणं, हेच त्यातल्या बहुतेकींचं जगणं, मात्र या सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर अस म्हणता येईल की 'नको कोंडमारा, जीवाचा सहारा, विठुराया'....!