Amit Thackeray in Nashik : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)  युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आजपासून नाशिक (Nashik) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  प्रामुख्याने जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवून दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. चार दिवसांच्या दौऱ्याचा प्रारंभ आज इगतपुरी (Igatpuri) पासून करण्यात येत आहे. 


शिवसेनेची (Shivsena) विस्कटलेली घडी बसविण्याचे काम आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घेतल्यानंतर आता काही काळापासून राजकीय वर्तुळात फारसे सक्रिय नसलेल्या मनसेने पुन्हा एकदा मोट बांधली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पूत्र अमित यांना राज्यव्यापी दाैऱ्यावर पाठवले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ते नाशिक दौऱ्यावर येत असल्याचे समजते. तत्पूर्वी मनविसे अध्यक्ष असलेले ठाकरे यांनी यापूर्वी काेकण तसेच मुंबईतील काही भागात दाैरे करून युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काही महाविद्यालयात जावून तेथील विद्यार्थ्याचे प्रश्नही जाणून घेतले. तर आजपासून ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत. 


आज अमित ठाकरे हे इगतपुरी तालुक्यापासून सुरवात करणार असून त्यानंतर सिन्नर, नाशिक तालुक्यातील गावांचा दौरा करणार आहेत. दरम्यान या चार दिवसांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये आणि अखेरच्या दिवशी ते सर्व युवा मतदार कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मनसोक्त संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाल्यानंतर अमित ठाकरे यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहर व जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनोविशेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या दौऱ्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. 


दरम्यान शिवसेनेत पडलेल्या दोन गटातील वादांमुळे युवा वर्ग शिवसेनेपासून दुरावत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अमित यांचा मनविसेचा संघटनात्मक दौरा हा त्यांचा राजकीय कारकीर्दीच्या दृष्टीने ही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. त्यात मनविसेच्या संघटनात्मक बांधणी करता अमित ठाकरे हे दौऱ्यावर येत असल्याने प्रामुख्याने युवा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, तालुका मिळावे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संवाद तसेच त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड, मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण, दिंडोरी, पेठ, नाशिक येथे या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


असा आहे महासंपर्क अभियान दौरा
दरम्यान अमित ठाकरे हे 06 ऑगस्ट रोजी नाशिकला येणार असून त्यामध्ये इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुका पिंजून काढणार आहेत. त्यानंतर 07 ऑगस्ट रोजी नाशिक ग्रामीणच्या निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड तालुक्यात दौरा करणार आहेत. 08 ऑगस्ट रोजी सटाणा- देवळा, कळवण, दिंडोरी, हरसुल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर 09 ऑगस्ट रोजी शहरातील नाशिक शहर, पूर्व नाशिक, मध्य नाशिक, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ फिरणार असल्याची माहिती आहे.