Gas Cylinder Blast : नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील (Sinnar) मुसळगाव एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मुसळगाव एमआयडीसी (Musalgoan MIDC) परिसरातील उज्ज्वलनगरमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात (Gas Cylinder Blast) दोघा सख्या भावांचा मृत्यू (Two Dies) झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 


एकीकडे गॅस स्फोटाच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दुसरीकडे अनेकदा गॅस लीक (Gas Leak) किंवा गॅसचा चुकीच्या वापरामुळे अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. सिन्नर तालुक्यात आता गॅस स्फोटाची घटना समोर आली असून यात दोन सख्ख्या भावांना आपला जीव गमवावा लागला आहे. कृष्णचंद्रा देवराज साकेत (27) व दीपराज देवराज साकेत (19) अशी या दोघांची नावे असून या घटनेत शुभम महादेव सोनवणे हा चौदा वर्षीय मुलगा गंभीर भाजला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. 


सिन्नर शहराजवळ मुसळगाव एमआयडीसी आहे. या ठिकाणी अनेक कंपन्या असल्याने सिन्नर शहरासह अन्य राज्यातून कामगार वर्ग वास्तव्यास आहे.  उज्वलनगर येथे हे दोघे बंधू वास्तव्यास होते. मूळचे उत्तरप्रदेशातील असणारे साकेत बंधू हे काही दिवसांपासून मुसळगाव एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात नोकरी करीत होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास एकाने चहा बनविण्यासाठी गॅस पेटवला. मात्र, तत्पूर्वीच गॅस गळती झालेली असल्याने गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात हे तिघेही गंभीर भाजले. 


दरम्यान घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कृष्णचंद्रा हा जवळपास 70-75 तर दिपराज हा 60 ते 65 टक्के भाजल्याने दोघांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाईक नरेंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.


गॅस वापरताना काळजी घ्या...
घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा.