Nashik Crime : पत्नी नांदायला येत नाही, या कारणाची कुरापत काढुन जावयाने सासुच्या पोटात कात्री खुपसुन ठार केल्याची धक्कदायक घटना त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील झारवाड येथ घडली आहे. तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जांभुळवाडी येथील कळमुस्ते येथील किसन महादु पारधी याचे लग्न झारवड येथील कमळाबाई सोमा भुंताबरे यांच्या मुलीशी झालेले होते. संशयित किसन महादु पारधी याला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी इंदुबाई किसन पारधी सासरी नांदावयास जात नव्हती. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास किसन पारधी हा झारवड येथे पत्नीच्या घरी आला. यावेळी घरात असणाऱ्या पत्नी इंदुबाईस सासरी नांदावयास का येत नाही, अशी कुरापत काढुन पत्नी इंदुबाई पारधी यांना विळ्याने गळ्यावर मारहाण करू लागला.
दरम्यान सासु कमळाबाई सोमा भूतांबरे (वय ५५) व संशयिताची मुलगी माधुरी किसन पारधी (वय १२) या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता किसन पारधी याने माधुरी पारधी हिच्या हातावर विळ्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने ती गंभीर जखमी झाली. तसेच सासु कमळाबाई भुतांबरे यांच्या पोटात व पाठीत कात्री खुपसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या घटनेत सासु जागीच ठार झाली आहे तर पत्नी इंदुबाई पारधी हिच्या गळ्यावर विळ्याने गंभीर वार केल्याने तिचीही प्रकृति चिंताजनक आहे. पत्नी व मुलीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल केले आहे. दरम्यान या प्रकरणी किसन पारधीच्या विरोधात घोटी पोलिसांत (Ghoti Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, सहायक पोलीस दिलीप खेडकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. यावेळी पोलीसांनी आरोपी किसन पारधी याला अटक केली असुन किसन पारधी जखमी असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.