Nashik Neo Metro : नाशिककमधील बहुचर्चित असलेल्या निओ मेट्रो संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकच्या निओ मेट्रोचे मार्ग निश्चित करण्यात आले असून लवकरच मेट्रोच्या कामाचा श्री गणेशा होणार असल्याची माहिती महा पालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली आहे. 


देशातील पहिली नियोजित टायरबेस्ड नियो मेट्रो नाशिकमध्ये होणार असल्याने अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. अखेर निओ मेट्रोच्या मार्गाचे निश्चितीकरण झाले आहे. त्यामुळे लवकरच शहरात नियो मेट्रोच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. विशेष गेल्या वर्षीच या कामाचा शुभारंभ होणार होता. परंतु करोनामुळे नियो मेट्रोच्या कामाला ब्रेक लागल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता नुकतीच नियो मेट्रोसाठी अलायमेंट शासनाकडून (दिशा) ठरवण्यात आल्याची माहीती पालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली.


दरम्यान बहुचर्चित निओ मेट्रोसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सितारामण यांनी दोन हजार 92 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापाठोपाठ महाविकास आघाडी सरकारने देखील एकवीसशे कोटी मदतीची घोषणा केली. त्यामुळे निओ मेट्रो होणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने हा प्रकल्प रखडला. मात्र आता दोन वर्षानंतर निओ मेट्रोला मार्ग निश्चितीला हिरवा कंदील मिळाला आहे. 


नाशिकरोड पासून ते गंगापूर रोड या दरम्यान विविध ठिकाणे ठरवून देण्यात आल्या आहेत. निओ मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यानंतर यापूर्वीच महामेट्रोने डिझाइन, प्रस्तावीत मार्ग महामेट्रोच्या नागपूर येथील तांत्रिक पथकाने नाशिकमध्ये येउन पाहणी केली होती. तसेच वर्षात एप्रिल व मे महिन्यात टायरबेस्ड मेट्रो प्रकल्पाच्या निविदा काढून कामाला सुरवात केली जाणार होती. परंतु कोरोनामुळे या कामाला फटका बसल्याचे बोलले जात होते. या कामावरुन नाशिककरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 


असा असेल मार्ग                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        निओ मेट्रोच्या कामासाठी दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार आहे. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर 10 किमी लांबीचा तर दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिकरोड असा 22 किमी लांबीचा असणार आहे. दरम्यान निओ मेट्रोसाठी आता निश्‍चित मार्ग तयार झाल्याने लवकरच शहरात या कामाचा शुभारंभ होणार आहे. नाशिककरांसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार असून याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहे. देशातील पहिला हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड मेट्रो निओ प्रकल्प नाशिकमध्ये साकारला जाणार आहे. 


सोबतीला सिटी लिंक 
गेल्या वर्षीच नाशिक शहरात सिटीलिंक शहर बस सुरु झाली आहे. आता या वाहतूक सेवेपाठोपाठ नियो मेट्रो सेवेत येणार असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात 2018 साली घेतलेल्या बैठकीत नाशिकमध्ये मेट्रो चालविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मेट्रो सर्वेक्षणाचे काम सिडको आणि महामेट्रोला देण्यात आले होते. नाशिक शहरात प्रवासी संख्या पाहता शहरात मेट्रो चालवणे शक्य असल्याचे दिसून येते.