नाशिक : राज्यभरात समाज कल्याण विभागामार्फत एकूण 441 शासकीय वसतिगृहे चालवली जातात. या सर्व वसतिगृहांतून विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी सुविधा व अभ्यासास पूरक वातावरण तयार व्हावे, यासाठी राज्यातील 33 वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सर्व वसतिगृहांच्या बांधकामासंदर्भात नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली असता त्याप्रसंगी याबाबत माहिती दिली आहे.
असा मिळाला निधी
- मुंबई विभाग - 1.81 कोटी
- लातुर विभाग - 1.32 कोटी
- अमरावती विभाग - 2.78 कोटी
- पुणे विभाग - 1.23 कोटी
- नाशिक विभाग - 24 लक्ष 72 हजार
- नागपूर विभाग - 2 लक्ष 40 हजार ,
- औरंगाबाद विभाग - 7 लक्ष 87 हजार,
एकूण 7 कोटी 50 लाख रुपये
या कामांना प्राधान्य
या निधीतून वसतिगृहांची विविध दुरुस्ती कामे, कपाटे अद्ययावत करणे, इमारत रंगवणे, कोटींग करणे, आवार संरक्षण भिंत उभारणे, शौचालय, बाथरुम, खिडक्या, दरवाजे, भिंतींची दुरुस्ती, ग्राऊंड फ्लोरिगं, रोलिंग, पाण्याची टाकी, स्ट्रिट लाईट, पेव्हर ब्लॉक बसविणे, टाईल्स बदलविणे, वॉटर प्रुफिंग, ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, बोअरवेल बाधकाम करणे अशी कामे करण्यात येणार आहे.
वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्रबिंदू
विद्यार्थ्यासाठी विशेषता: शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर म्हणून वसतीगृहांकडे बघितले जाते. राज्यातील विविध भागात असणाऱ्या वसतीगृहांतुन अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकासाची वसतीगृहे ही केंद्रे बनली आहेत. विद्यार्थांच्या जडणघडणीत मोलाचे स्थान या वसतीगृहांचे आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासात महत्वाची भुमिका असलेल्या शासकिय वसतिगृहाच्या इमारतींच्या दुरुस्ती करुन सर्व आवश्यक सोई सुविधांसह विद्यार्थ्यांना निवासासाकरिता तसेच अभ्यासाकरिता पुरक वातावरण यामुळे उपलब्ध होणार आहे.
समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, राज्यातील एकुण 441 शासकीय वसतीगृहापैकी 33 वसतिगृहाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सन 2021-22 मध्ये प्राप्त झाले होते. त्यासदंर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरवा करण्यात येत होता. समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे व सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजुर होऊन निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतुन वसतीगृहाचा दर्जा अधिक उंचविण्याबरोबरच विद्यार्थाची गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.