Maharashtra Political Crises : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड शिवसेनेला महागात पडणार असून शिंदेंचा गट बुलंद होताना दिसतो. कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांनी देखील शिंदे यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे सोबतीततले शिलेदार ही हात सोडून जात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोंडीत सापडले आहेत. 


एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केल्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदार गुवाहाटीत दाखल झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत आपल्या मनातील खदखद सगळ्यांसमोर मांडली. शिंदे यांना उद्देशून ही त्यांनी भावनिक साद घातली. मात्र त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. त्यांच्या आवाहनानंतर देखील काही आमदार, शिंदे यांच्या गोटात दाखल होत आहेत. ही संख्या वाढतच चालली  असल्याने शिवसेना एकटी पडत चालल्याचे चित्र आहे.


दरम्यान, शिंदे यांच्या गुवाहाटी येथील कलायमॅक्स नंतर उद्धव ठाकरे यांनी संवादातून आमदारांना देखील आवाहन केले. माझ्यासमोर येऊन राजीनामा मागा, मी द्यायला तयार आहे', यावेळी त्यांच्यासोबत असलेले आमदार देखील आज शिंदे गटाकडे पसार झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून मातोश्रीकडे जात असताना काही मंत्र्यांना स्वतःच्या गाडीत वर्षावरून हॉटेल सेंट रेजिसला घेऊन गेले होते. त्यात गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, सदा सरवणकर, संतोष बांगर ही सर्व मंडळी देखील शिंदे गटाला मिळाली आहेत.


फोन चालू, ठावठिकाणा नाही


दरम्यान कालपर्यंत मुंबईत असलेले दादा भुसे आज सकाळपासून नेमके कुठे? आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भुसे यांचा फोन रीचेबल असून ते  कुणाचाही फोन रिसिव्ह करत नसल्याने भुसे देखील शिंदे गटात गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


शिंदेचे निकटवर्तीय तर ठाकरेंचे विश्वासू


कृषीमंत्री दादा भुसे नाशिकमधील आमदार असून ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आहेत. मात्र त्या उलट भुसे हे शिंदे निकटवर्तीय असून त्यांच्यात घरोबा असल्याचे सांगितले जाते.